Uddhav Thackeray on BJP : महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ नसून प्रत्यक्षात ‘ऑपरेशन देवेंद्र’ सुरू आहे, असा मोठा राजकीय बॉम्ब शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यांनी टाकला.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आमचे खासदार फोडण्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातच अडकवून ठेवण्याचा डाव असून ही संपूर्ण रणनीती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
हिंगोलीतील महावीर भवन येथे शनिवारी आयोजित जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या (BJP) अंतर्गत सत्तासंघर्षावर थेट निशाणा साधला. कदाचित भविष्यात देवेंद्र फडणवीस पंतप्रधानपदाच्या शर्यतीत येऊ शकतात, त्यामुळे त्यांचे राजकीय पंख छाटण्याचे काम सुरू आहे. यासाठीच आमचे खासदार फोडले गेले. मात्र त्यांना भाजपमध्ये न घेता त्यांच्या गुलामांकडे पाठवण्यात आले, असा हल्लाबोल त्यांनी केला.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुढे दावा केला की, भविष्यात पंतप्रधानपदाच्या समीकरणांमध्ये गद्दार खासदार अमित शाह यांनाच पसंती देतील, अशी पूर्ण व्यवस्था आधीच आखण्यात आली आहे. या सभेला खासदार संजय राऊत, आमदार अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित होते.
हिंगोली आणि परभणीच्या राजकीय इतिहासाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले, या भागातून जो कोणी गद्दारी करून गेला, तो पुन्हा कधीच राजकारणात परतला नाही. या मातीत बंडखोरांना कधीच आश्रय मिळत नाही. ज्यांची पात्रता नव्हती, त्यांनाही आम्ही खासदार केले; आता त्यांना शिवसैनिकच जाब विचारतील.
लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित बहुमत मिळू न देण्यात विरोधक यशस्वी ठरल्याचा दावा करत त्यांनी म्हटले की, आपण भाजपला 240 जागांवर रोखलं. आता त्यांना संविधान बदलण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत हवं आहे. त्यामुळेच देशभरात खासदार फोडाफोडीचे राजकारण सुरू करण्यात आले आहे, असेही ठाकरे यांनी म्हटलं.
राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. लोकशाही संपवली जात आहे. शेतकरी मरत आहेत, विद्यार्थी आत्महत्या करत आहेत, परीक्षा पेपरफुटी होत आहेत, पण सरकारला त्याचं काहीच वाटत नाही, अशी टीका त्यांनी केली.
अलीकडील देशआतील नीट आणि महाराष्ट्रातील टीईटी पेपरफुटी प्रकरणांचा उल्लेख करत त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली. या प्रकरणाचा केंद्रबिंदू महाराष्ट्रात होता, आरोपींचे सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचे बोलले जाते, मग जबाबदारी कोण घेणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेवटी शिवसेनेच्या भवितव्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी, बंडखोरी कितीही झाली तरी शिवसैनिक आणि शिवसेना कधीच संपणार नाही. आम्ही पुन्हा नव्याने उभे राहू आणि येथे पुन्हा आमचाच खासदार निवडून आणू, असे विश्वास व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.