Uddhav Thackeray On MNS News Sarkarnama
मराठवाडा

MNS-Shivsena UBT News : मनसे सोबत युती करायची का ? उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर पदाधिकारी- कार्यकर्त्यांशी खलबते!

After Uddhav Thackeray’s directive, Shiv Sena begins consulting party leaders and workers on the possibility of forming an alliance with MNS : मनसेची पाटी कोरी असली तरी या पक्षाकडे तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. त्यांना निश्चित कार्यक्रम दिल्यास ते जिल्ह्याच्या राजकारणात आपले अस्तित्व निर्माण करू शकतात.

Jagdish Pansare

Chhatrtapati Sambhajinagar : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या 59 व्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात मराठी माणसाच्या आणि राज्यातील जनतेच्या जे मनात आहे, तेच मी करणार, असे सांगत मनसे सोबतच्या युतीचे संकेत दिले. दरम्यान या मेळाव्यानंतर झालेल्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मनसे सोबतच्या युतीसाठी पक्षाच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांशी चर्चा करून त्यांची मतं जाणून घ्या, असे आदेश दिले.

त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसे (MNS) सोबतच्या युती संदर्भात पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांचे मत विचारात घेतले जाणार आहे. या बैठकीतील अहवाल दोन दिवसात उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यातील जिल्हाप्रमुख आपापल्या भागातील पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या मनसेसोबत युतीच्या ज्या भावना आहेत त्या कळवणार आहे. त्यानंतरच मनसेशी युती होणार की नाही? याचा फैसला केला जाणार आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून मनसेशी युती करायची का नाही याची चाचपणी सुरू असली तरी मनसेच्या राज्य व स्थानिक पातळीवरच्या नेत्यांकडून फारशा हालचाली होताना दिसत नाहीत. संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत युती संदर्भात अद्याप कुठल्याही सूचना स्थानिक पातळीवर आम्हाला आलेल्या नाहीत, असे मनसेचे स्थानिक नेते सांगत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजू वैद्य यांनी पदाधिकारी, शिवसैनिकांच्या बैठका घेऊन दोन दिवसात मनसेसोबत युतीच्या प्रस्तावावर अहवाल पाठवणार असल्याचे सांगितले आहे.

छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्याचा विचार केला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मनसे सोबतच्या युतीचा काही प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. पक्षात फूट पडल्यानंतर आणि त्यानंतरही मोठ्या प्रमाणात गळती सुरूच असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळावर लढायचे असेल तर नव्या पक्षाची साथ आवश्यक आहे. त्यात राज ठाकरे यांच्या मनसेशी युती झाली तर त्याचा चांगला परिणाम महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दिसेल, असा एकंदरीत सूर स्थानिक नेत्यांमधून निघतो आहे.

महायुती विरुद्ध एकट्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा टिकाव लागणार नाही. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाची शहरात फारशी ताकद नाही. याउलट मनसेची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आतापर्यंत पाटी कोरी राहिली असली तरी या पक्षाकडे तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. त्यांना निश्चित कार्यक्रम दिल्यास ते जिल्ह्याच्या राजकारणात आपले अस्तित्व निर्माण करू शकतात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी मनसेची युती झाली तर ती महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकते. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकांकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT