
Mumbai News : मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असल्याने सर्वच पक्षाने तयारी सुरु केली आहे. एकसंध शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना हा गड राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यातूनच गेल्या काही दिवसापासून बैठकांचा सिलसिला सुरु आहे. वर्धापनदिन मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकताना येत्या काळात मनसेसोबत युती करण्याचे संकेत दिले आहेत. त्यातच आता शुक्रवारी रात्री राज्यातील आमदार-खासदारांना बोलवले असून या बैठकीत आगामी निवडणुकीसंदर्भात मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा 59 वर्धापनदिन सोहळा गुरुवारी मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडला. या सोहळ्यावेळी झालेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीबद्दल सूचक विधान केले. “बातम्या सुरू आहेत. काय होणार? कस होणार? होणार की नाही होणार, कळेल ना. राज्याच्या मनात आहे तेच मी करणार आहे, जे राज्याला हवे तेच करणार असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे येत्या काळात मनसे-शिवसेना (Shivsena) युतीबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. उद्धव ठाकरेंच्या या सूचक वक्तव्यानंतर सर्वच पक्षातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या शुक्रवारी दोन महत्वपूर्ण बैठका होत आहेत. त्यामध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी दुपारी आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख यांची बैठक शिवसेना भवन येथे होणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असून यावेळी निवडणुकीच्या अनुषंगाने ते आढावा घेणार आहेत. त्यामुळे ही बैठक येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण मानली जात आहे.
शुक्रवारी सायंकाळी राज्यातील खासदार, आमदारांची बैठक मातोश्री या निवासस्थानी होत आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे खासदार व आमदारासोबत येत्या काळात मनसेला सोबत घेण्यासंबधी विचार विनमय करणार आहेत. त्यावेळी खासदार, आमदार यांची मते जाणून घेतली जाणार आहेत. चार दिवसापूर्वी झालेल्या मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीतही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आगामी निवडणुकीसाठी मनसेसोबत युती करायची की नाही? याबाबत पक्षाच्या माजी नगरसेवकांना विचारणा केली असल्याची माहिती काही माजी नगरसेवकांनी दिली होती. त्यावेळी येत्या काळात युती केली तर फायदाच होईल, अशी कबुली माजी नगरसेवकांनी दिल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे या बैठकीतही मते जाणून घेण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
त्यासोबतच या बैठकीत आगामी निवडणुकांची रणनीती, युतीचे धोरण, तसेच पक्षांतर्गत संघटनात्मक बदल यावर चर्चा होऊ शकते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून, उपस्थित आमदार-खासदारांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे.
ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार असल्याने ही बैठक महत्वपूर्ण मानली जात आहे. या बैठकीनंतरच येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मनसे- उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येणार का ? हे समजू शकते. त्यामुळे याची उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे शुक्रवारचा दिवस मनसे-उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण मानला जात आहे. ठाकरे गटाच्या दोन महत्वाच्या बैठक होत आहेत तर दुसरीकडे मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची देखील बैठक होत आहे. त्यामुळे याविषयी काय चर्चा होणार याची उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.