Shivling Bodhane joins Shiv Sena UBT Sarkarnama
मराठवाडा

Shivsena UBT News : शिवसेनेत प्रवेश करून आमदारकी मिळविणाऱ्या बच्चू कडूंना उद्धव ठाकरेंकडून पहिला दणका; 'प्रहार'ला पाडले खिंडार

Bacchu Kadu news, Prahar Janshakti Party setback : प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधणे ह्यांनी आज मातोश्री येथे त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.

Jagdish Pansare

Parbhani News : विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या बच्चू कडू यांच्या निर्णयाविरोधात मराठवाड्यात मोठा असंतोष पसरला होता. प्रहार जनशक्ती पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आमच्याशी चर्चा न करता केवळ आमदारकीसाठी बच्चू कडूंनी आमचा विश्वासघात केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता कडू यांना पहिला झटका बसला आहे.

बच्चू यांच्यावर टीका करण्यात आघाडीवर असणारे 'प्रहार' परभणीचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधणे यांनी या नाराजीतून मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आपली पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट केली. मुंबईत मातोश्रीवर बोधणे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह मशाल हाती घेत पक्षात प्रवेश केला.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे, डॉ. राहुल पाटील, जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, जिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे, महानगरप्रमुख विवेक नावंदर उपस्थित होते. 'प्रहार जनशक्ती पक्षामध्ये काम करणारा प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता हा स्वाभिमानाने जगणारा आहे. मात्र बच्चू कडू यांनी एका आमदारकीसाठी आमचा पक्ष एकनाथ शिंदे यांच्या दावणीला बांधला आहे,' असा संताप बोधणे यांनी व्यक्त केला.

पक्षासाठी राबणाऱ्या, अंगावर अनेक केसेस घेणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना उध्वस्त करून तुम्ही घेतलेला हा निर्णय आणि मिळालेली आमदारकी तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही, अशा शब्दांत शिवलिंग बोधणे यांनी बच्चू कडू यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशावरून टीका केली. कडू यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, विधानपरिषदेच्या रिक्त नऊ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तेव्हा बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आमदारकी मिळवली होती. शेतकरी आणि दिव्यांगांच्या हितासाठी आपण हा निर्णय घेतला, असा दावा बच्चू कडू यांनी केला होता. मात्र त्यांच्या या पक्षप्रवेशानंतर प्रहार जनशक्ती पक्षात एकच खळबळ उडाली होती.

परभणी येथील पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधणे यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी व कोअर कमिटीतील सदस्यांची बैठक घेऊन बच्चू कडू यांच्या या निर्णयावर तोफ डागली होती. प्रहार ही एक संघटना होती, दहा वर्षांपूर्वी तिचे प्रहार जनशक्ती पक्ष या एका राजकीय पक्षांमध्ये रूपांतर झाले. शेतकरी, कष्टकरी आणि दिव्यांगांसाठी रस्त्यावर उतरून झटणारी संघटना आणि त्याचे नेतृत्व करणारे बच्चू कडू यांना लोकांनी डोक्यावर घेतले, असे बोधणे म्हणाले होते.

कडू एका आमदारकीसाठी पक्ष एकनाथ शिंदे यांच्या दावणीला नेऊन बांधला. हा अधिकार बच्चू कडू यांना कोणी दिला? आमच्यासारख्या पक्षावर प्रेम करणाऱ्या आणि शेतकरी दिव्यांगांसाठी रस्त्यावर उतरून लढणाऱ्या कार्यकर्त्यांना उध्वस्त करण्याचा, त्यांना राजकीय आयुष्यातून उठवण्याचा अधिकार बच्चू कडू यांना नाही, असा घणाघात बोधणे यांनी केला होता.

आमचे राजकीय आयुष्य तुम्ही संपवत आहात. गेली अनेक वर्ष राजकारणात सक्रीय होऊन समाजसेवा करण्याचा आमचा प्रयत्न तुमच्या एका निर्णयाने संपुष्टात आल्याची टीका बोधणे यांनी केली होती. त्यानंतर महिनाभरातच बोधणे यांनी शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षात प्रवेशाचा निर्णय घेतला. परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू असतानाच ठाकरेंच्या पक्षात प्रहारच्या आक्रमक पदाधिकारी कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT