Uddhav Thakrey
Uddhav Thakrey Sarkarnama
मराठवाडा

उद्धव ठाकरेंना 1996 मध्ये मुख्यमंत्री व्हायचे होते : शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांचा गौप्यस्फोट

सरकारनामा ब्युरो

बीड : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना 1996 पासून मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती. त्यांच्या सांगण्यावरुनच आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे उद्धवजी यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद देण्याचा आग्रह केला होता, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे माजी मंत्री सुरेश नवले यांनी केला आहे. बीडमध्ये माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. सुरेश नवले यांनी काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आज त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

"1996 पासूनच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती. त्यावेळी त्यांनी मला, माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि चंद्रकांत खैरे यांना बाळासाहेब ठाकरेंकडे पाठवलं होतं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद द्यावं, अशी मागणी आमच्याकडून करायला लावली. पण त्यावेळी त्यांची ती इच्छा पूर्ण झाली नाही. मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला. त्यानंतर फेब्रुवारी 1999 ते ऑक्टोबर 1999 या नऊ महिन्यांच्या काळात नारायण राणे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. त्यानंतर 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला त्यावेळी त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा पूर्ण झाली,''असा गौप्यस्फोट सुरेश नवले यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर माझ्या घरावर हल्ला झाला तेव्हाही त्या हल्ल्याचा सुत्रधारही उद्धव ठाकरे हेच होते, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या आग्रहानुसार आम्ही बाळासाहेबांकडे जाऊन त्यांच्या मुख्यमंत्री पदाची मागणी केली. पण त्यामुळे मनोहर जोशी आमच्यावर नाराज झाले. बाळासाहेबांनी आम्हाला, तुम्ही उत्स्फूर्तपणे सांगताय की तुम्हाला कोणी सांगायला लावतंलंय, असं विचारलं पण आम्हाला कोणी सांगितलेलं नाही, असं आम्ही त्यांच्याशी खोटं बोललो. पण आम्हाला हे सांगायला लावणारे उद्धव ठाकरेच होते. असही नवले यांनी सांगितले.

वयाच्या ३८ व्या वर्षी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. पण १९९६ मध्ये उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री झाले असते तर, ते वयाच्या ३६ व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारे सर्वात तरुण नेते ठरले असते.

कोण आहेत सुरेश नवले?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९० आणि १९९५ मध्ये शिवसेनेकडून राज्यातील सर्वात पहिला उमेदवार म्हणून सुरेश नवले यांचे नाव जाहीर केले होते. ठाकरे कुटुंबाच्या अत्यंत जवळचे अशीही त्यांची ओळख आहे. इतकेच नव्हे तर नारायण राणे मुख्यमंत्री असताना नवले हे त्यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात. सुरेश नवले ऊर्जा विभागाचं राज्यमंत्री होते. पण नारायण राणेंसोबत त्यांनी शिवसेना सोडून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. कॉंग्रेसमध्ये त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली होती. राणेंनी अचानक भाजपात प्रवेश केला पण नवले कॉंग्रेसमध्येच राहिले. गेल्या काही वर्षांपासून नवले राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. मात्र एकनाथ शिंदेच्या गटात सामील झाल्यास आपल्याला राजकारणात सक्रीय होता येईल या उद्देशाने नवले शिंदे गटात सहभागी झाल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT