Ambadas Danve- Amit Shah Sarkarnama
मराठवाडा

Amit Shah : देशातील उद्योग पळव्या गँगचे अमित शाह 'व्हाईस कॅप्टन'; शिवसेनेचा पलटवार !

Jagdish Pansare

Chatrapati Sambhaji Nagar : देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी भाजपच्या अधिवेशनासाठी पुण्यात येऊन गेले. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुखांना टार्गेट केले. उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत, अशा शब्दात शाह यांनी त्यांच्यावर टीका केली.

शरद पवारांचाही भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार असे म्हणत त्यांच्यावर हल्ला चढवला. आगामी विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सपाटून मार खाल्ल्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि उर्जा निर्माण करण्यासाठी शाह यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले.

उद्धव ठाकरे यांना औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष ही केलेली टीका शिवसेनेच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी अमित शाह यांच्यावर पलटवार करतांना त्यांना देशातील उद्योग पळव्या गँगचे व्हाईस कॅप्टन अशी उपाधी देत परतफेड केली आहे. अंबादास दानवे यांनी ट्विट करत अमित शाह यांच्यावर निशाणा साधला.

दिल्लीतून महाराष्ट्रात नेत्यांच्या फौजा पाठवायच्या तुम्ही, अन औरंगजेबाचे नाव आम्हाला, वा रे वा? विरोधकांशी तुमचे असलेले बोलणे, वागणे, राजकीय दबाव टाकणे ही औरंगजेबी वृत्ती आज कोण पोसते आहे हे देश बघतो आहे. देशाच्या 'उद्योग पळवे' गँगचे व्हाईस कॅप्टन महाराष्ट्रात आले होते, इथल्या मातीची, लोकांसाठी झगडणाऱ्या माणसांना काही तरी नावं ठेवायचे,घालून पाडून बोलायचे हा यांचा रटाळ अजेंडा लोकसभेत आपटी खाऊनही कायम आहे.

राहिला प्रश्न संभाजीनगरचा.. बेगडी समर्थकांनी जे 2014-19 दरम्यान केले नाही, ते आम्ही केले. ती चिकलठाणा विमानतळाच्या नावाची फाईल तुमच्या टेबलावर धूळखात पडली आहे.. तेवढं होतं का बघा!, अशा शब्दात भाजप आणि त्यांचे केंद्रातील बडे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमित शाह यांच्यावर अंबादास दानवे यांनी तोंडसुख घेतले.

अमित शाह (Amit Shah) यांच्या भाषणाचे राज्याच्या राजकारणात पडसाद उमटायला लागले आहेत. लोकसभेत झालेला पराभव, चारशे पार चे स्वप्न भंगल्यामुळे अमित शाह चांगलेच संतापले आहेत. यातूनच त्यांनी कालच्या आपल्या भाषणात सगळा राग उद्धव ठाकरे,शरद पवार, राहुल गांधी यांच्यावर टीका करत व्यक्त केल्याची चर्चाही सुरू झाली आहे.पुढील आणखी काही दिवस हा कलगितुरा दोन्ही बाजूंनी सुरुच राहील असे दिसते.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT