Amit Shah  Sarkarnama
मराठवाडा

Amit Shah on Thackeray: अमित शाह उद्धव ठाकरेंवर पुन्हा बरसले; 'या' मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट करण्याचे दिले आव्हान

सरकारनामा ब्यूरो

Political News: केंद्रातील मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. राज्यात 30 जूनपर्यंत भाजपकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज नांदेडमध्ये भाजपची जाहीर सभा पार पडली. या सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संबोधित केलं.

यावेळी अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह राहुल गांधी, शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच उद्धव ठाकरे यांना आव्हान देत मुस्लिम आरक्षण ते ट्रिपल तलाकवर आपली भूमिका स्पष्ट करावी, असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला.

अमित शाह म्हणाले, "मी ज्यावेळी पक्षाचा अध्यक्ष होतो तेव्हा मी आणि देवेंद्र फडणवीस जागा वाटपाबद्दल चर्चा करण्यासाठी गेलो होतो. तेव्हा उद्धव ठाकरेंनी मान्य केलं होतं, बहुमत एनडीएला मिळालं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एनडीए जिंकली त्यावेळी त्यांनी दिलेलं वचन मोडलं आणि सत्तेसाठी ते राष्ट्रवादी, काँग्रेससोबत गेले. दगा करण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं", असा गौप्यस्फोट अमित शाह यांनी केला.

"उद्धव ठाकरे यांना माझं आव्हान आहे, त्यांनी मुस्लिम आरक्षण ते ट्रिपल तलाकवर आपली भूमिका स्पष्ट करावी. तसेच राम मंदिर आणि मुस्लिम आरक्षण हवं की नको? यावरही उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी. उद्धव ठाकरे तुम्ही दोन दगडावर पाय ठेवू नका. हिम्मत असेल तर तुमची भूमिका स्पष्ट करा", असं थेट आव्हान अमित शाह यांनी ठाकरेंना दिलं.

दरम्यान, "आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून 45 जागा जिंकण्याचा संकल्प केला आहे, अशी मोठी घोषणा देखील त्यांनी यावेळी केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राला विकासात पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले", असं ते म्हणाले.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT