Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation : वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांच्या हस्ते महापालिकेतील गट नेत्याच्या दालनाच्या उद्घाटनाचा वाद चांगलाच तापला आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता असताना दालनाचे उद्घाटन कसे केले? अशी विचारणा करत एमआयएमने थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. यावर महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी आयोगाकडून मार्गदर्शन मागविले आहे.
यावर वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक तथा नेते अमित भुईगळ यांनी एमआयएमवर हल्लाबोल केला आहे. हा आमचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता, तो आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच होता. यापूर्वी दोनवेळा आमचे नेते सुजात आंबेडकर येऊ शकले नाहीत. त्यामुळे गटनेत्याच्या दालनाचे उद्घाटन आता झाले. राहिला प्रश्न फटाके, ढोल वाजवण्चा तर उत्साही कार्यकर्त्यांनी ते वाजवले
आम्ही चारही नगसेवक दालनात होतो. मला एमआयएमला एकच सांगायचे आहे, त्यांनी फार पर्सनल लेव्हलला जाऊ नये, त्यांचे अनेक घोटाळे आहेत, मग आम्हालाही त्यांच्या मागे लागावे लागेल, असा इशाराच भुईगळ यांनी दिला. एकूणच दालनाच्या उद्घाटनावरून वंचित-एमआयएममध्ये पुन्हा संघर्ष भडकला आहे.
छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता सुरू असताना वंचित बहुजन आघाडीच्या गटनेत्याच्या दालनाचे बुधवारी (ता. १४) महापालिकेत उद्घघाटन करण्यात आले होते. हा प्रकार आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार एमआयएम पक्षाने केली आहे. त्यावर निवडणूक विभागाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले.
महापालिकेत विरोधीपक्ष असलेल्या एमआयएम व वंचित बहुजन आघाडीमध्ये दालनावरून वाद रंगला आहे. ‘वंचित’च्या गटात केवळ पाच नगरसेवक असताना गटनेत्याला एवढे मोठे दालन कशाला? असा आक्षेप एमआयएम पक्षाचे विरोधीपक्षनेते समीर साजेद बिल्डर यांनी घेतला होता. ‘वंचित’चे गटनेते अफसर खान यांनी मंत्री अतुल सावे यांना विधानसभा निवडणुकीत मदत केल्यामुळे बक्षीस दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
हा वाद सुरू असतानाच बुधवारी युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या हस्ते या दालनाचे धुमधडाक्यात उद्घघाटन करण्यात आले. त्यावर देखील समीर बिल्डर यांनी आक्षेप घेत याप्रकरणी आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी महापालिका आयुक्तांसह निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पोलिस आयुक्तांकडे केली आहे.
याविषयी अमोल येडगे यांनी प्राप्त तक्रारीनुसार निवडणुक विभागाला पत्र देऊन मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. महापालिकेचा या कार्यक्रमाशी संबंध नव्हता, मी त्यावेळी स्मार्ट सिटी कार्यालयात बैठक घेत होतो, तर महापौर मुंबईला होते. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.