Prakash Ambedkar and Devendra Fadnavis Sarkarnama
मराठवाडा

Prakash Ambedkar : भूमच्या घटनेवरुन अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर भडकले; म्हणाले, 'फडणवीसांचे गृहमंत्रालय...'

Shital Waghmare

Dharashiv News : 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' असे ब्रिदवाक्य पोलिस दलाची ओळख आहे. मात्र भूममध्ये पोलिस दलातील हवालदार आणि होमगार्डने एका महिलेला ब्लॅकमेल करून तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आणि पोलिस खात्याची प्रतिमा मलीन झाली. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी थेट गृहमंत्रालयालाच धारेवर धरले आहे. (Prakash Ambedkar On Devendra Fadnavis)

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहमंत्रालय कुचकामी आहे. त्यांच्या अखत्यारित असलेल्या पोलिसांकडून गंभीर गुन्हा घडला. त्याची जबाबदारी गृहमंत्रालय घेणार का ? राज्यातील माता-भगिनी सुरक्षित आहेत का ? असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारवर टीका केली. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात एका पोलिस कर्मचार्‍याने होमगार्डच्या मदतीने एका महिलेवर अत्याचार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महिलेच्या आक्रोशानंतर भूम पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. या घटनेनंतर पोलिस प्रशासनातील कर्मचारीच महिलांच्या जीवावर उठले तर जनतेला न्याय कोण देणार ? प्रशासन आणि सरकारच्या नाकर्तेपणामुळेच असे घडत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्यामधून उमटू लागल्या. 

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे सपशेल अपयश आहे. आरोपींना कठोर शिक्षा केली जावी, तरंच राज्यात वाढत असलेला महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निकाली निघेल, असे स्पष्ट मत प्रकाश आंबेडकर यांनी `एस्क`वर व्यक्त केले. भूम तालुक्यातील या संतापजनक घटनेनंतर जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी भूम पोलिस ठाण्याला भेट दिली आणि घटनेची माहिती घेतली. दरम्यान, या घटनेने जनसामान्यांतून संताप व्यक्त होत आहे.

काय आहे भूमचे प्रकरण ?

2 फेब्रुवारीला एक महिला आणि तिचा दीर दुपारी भूम येथून बार्शीला जाण्यासाठी बसची वाट पाहत होते. पोलिस हवालदार दगडू सुदाम भुरके यांनी तुम्ही कुठून आलात ? कशासाठी थांबलात ? तुम्ही चोर दिसताय, तुम्हाला पोलिस स्टेशनला घेऊन जातो, असे धमकावले. पोलिसांनी त्यांना भूम बाजारतळ या ठिकाणी नेत मारहाण करून उठबशा काढायला लावल्या. नंतर सोडून देण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली.

त्यावर महिलेने मी ऊसतोड कामगार असून माझ्याजवळ पैसे नाहीत तर कुठून देणार ? असे सांगितले. तरीही तिने मुकादमाला फोन लावला आणि पोलिसाच्या फोन-पेवर 10 हजार पाठविण्यास सांगितले. पैसे पाठवल्यानंतर पोलिस हवालदार भुरके यांनी त्या दोघांना मोटरसायकलवर बसवून अष्टावाडीकडे सोडून दिले.

काही वेळाने पुन्हा दगडू भुरके याने फोनवर कोणाला तरी बोलून फिर्यादी महिलेला तुला मॅडमने बोलावले आहे, असे सांगून गाडीवर बसवत भूमकडे येत असताना तिच्यावर अत्याचार केला. या प्रकाराला होमगार्डची थेट साथ होती. घटनेनंतर तिला पुन्हा आष्टावाडी पाटी येथे नेवून सोडले. या प्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिल्यानंतर भूम पोलिस ठाण्यात दोघांवरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

(Edited By-Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT