Prakash Ambedkar Sarkarnama
मराठवाडा

VBA News : अकोला मोहीम संपल्यानंतर आंबेडकरांनी संभाजीनगरात घातले लक्ष...

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : एमआयएमने (MIM) आमच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली. वंचित बहुजन आघाडीने एमआयएम वर सूड उगवण्यासाठी इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्या मुस्लिम मतांना सुरुंग लावण्याची खेळी केली. अफसर खान यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर संभाजीनगरकडे फारसे लक्ष न देणारे प्रकाश आंबेडकर आणि त्यांची टीम आता चांगलीच सक्रिय झाली आहे.(Loksabha Election)

स्वतः प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) शहरात जाहीर सभा घेत अफसर खान यांना बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर आता अंजली आंबेडकर वैजापूर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रचार सभा घेणार आहेत. प्रकाश आंबेडकर स्वतः अकोल्यातून निवडणूक लढवत असल्यामुळे तिथे मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांनी आता महाराष्ट्रातील इतर भागातील वंचितच्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरवात केली आहे.

संभाजीनगरात वंचित आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अफसर खान यांना एबी फॉर्म दिला नव्हता. एमआयएमने अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे त्यांनी मोठे मन करत संभाजीनगरातून माघार घेतली की काय? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु अकोला लोकसभा मतदारसंघाचे (Loksabha Election) मतदान होईपर्यंत खान यांना संभाजीनगरात एबी फॉर्म द्यायचा नाही, अशी रणनिती आखण्यात आली होती.

त्यानूसार 26 एप्रिल रोजी मतदान पार पडल्यानंतर अफसर खान यांना पक्षाकडून एबी फार्म मिळाला आणि तो वंचित कडून भरलेल्या अर्जासोबत जोडला. पण त्याआधी जणू आपल्या वंचितने फसवले असा आव आणत अफसर खान (Afsar Khan) यांनी पत्रकार परिषद घेत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे घोषित केले होते. एवढेच नाही तर उमेदवारी अर्ज दाखल करून आल्यानंतर त्यांनी माध्यमांना आपण अपक्ष उमेदवारी दाखल केल्याचे सांगितले होते.

एकूण हा सगळा आखलेल्या रणनीतीचा भाग होता हे आता स्पष्ट झाले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी आपल्याला मदत केली नाही, ही गोष्ट आंबेडकरांच्या मनात घर करून गेली आहे, हे त्यांच्या आरोपांवरुन स्पष्ट होते. वंचितच्या पाठिंब्यावर एमआयएमचा महाराष्ट्रातील पहिला खासदार गेल्यावेळी निवडून आला होता.

आता त्याच खासदाराला पाडण्यासाठी वंचितने अफसर खान यांना उमेदवारी देत त्यांच्या मागे बळ उभे केले आहे. अफसर खान यांना मिळणाऱ्या दलित-मुस्लिम मतांचा थेट परिणाम एमआयएमच्या (MIM) इम्तियाज जलील यांच्यावर होणार आहे. महायुतीचे संदीपान भुमरे, महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) या दोन प्रमुख उमेदवारांसोबतच एमआयएमला वंचितच्या उमेदवारालाही तोंड द्यावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT