Latur Loksabha Election 2024 : लातूरकरांचा कौल ठरवणार जिल्ह्याचे नेतृत्व देशमुख की निलंगेकर यांच्या हाती?

Amit Deshmukh Vs Sambhaji Patil Nilangekar : लातूर जिल्ह्याच्या पाण्याचा प्रश्न, मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी, शेतीमालाचे पडलेले भाव आदी मुद्यांवर देशमुख आणि निलंगेकर एकमेकांवर तुटून पडले होते.
sambhaji patil nilangekar amit deshmukh
sambhaji patil nilangekar amit deshmukhsarkarnama

Latur News, 6 May : लोकसभा निवडणुकीचा ( Lok Sabha Election 2024 ) प्रचार रविवारी (ता.5 मे) संपला, मंगळवारी (ता.7 मे) रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या निमित्ताने लातूर जिल्ह्यातील दोन राजकीय घराण्यांमधील संघर्षही समोर आला. आता उद्याच्या मतदानानंतर लातूर जिल्ह्याचे नेतृत्व देशमुख की निलंगेकरांच्या हाती? याचा फैसला होणार आहे. लातूर जिल्ह्याच्या राजकारणावर बाभळगावच्या देशमुखांच्या गढीचे कायम वर्चस्व राहिले. दिवंगत नेते विलासराव देशमुख ( Vilasarao Deshmukh ) यांनी लातूर जिल्ह्यातील काँग्रेसचा झेंडा कधी खाली उतरू दिला नव्हता. पण, त्यांच्या पश्चात जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची दयनीय अवस्था झाली.

ज्या देशमुखांकडे जिल्हा किंगमेकर म्हणून पाहिलं जायचं, त्यांनाच आपली आमदारकी आणि मतदारसंघ राखण्यासाठी तडजोडी कराव्या लागत आहेत. लातूरमध्ये ( Latur ) झिरो अस्तित्व असलेल्या भाजपला संभाजी पाटील-निलंगेकर ( Sambhaji Patil Nilangekar ) यांच्या मंत्रीपदाच्या काळात हिरो होण्याची संधी काँग्रेसच्या कुमकुवत नेतृत्वाने दिली. राज्यातील सत्ता आणि मंत्रीपदाचा पुरेपूर वापर करत निलंगेकर यांनी महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात विजयाचे कमळ फुलवले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जिल्ह्यात भाजपला अच्छे दिन आणतानाच निलंगेकर यांनी राज्य पातळीवर आपले वजनही वाढवले. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने आपले खासदार निवडून आणत संपूर्ण संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मिळवली. गेली पाच-दहा वर्ष जिल्ह्यात विरोधक आहे की नाही? अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु, 2024 मध्ये हे चित्र बदलले. राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला, अमित देशमुख ( Amit Deshmukh ) यांना पुन्हा पालकमंत्री पद आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून जबाबदारी मिळाली आणि खऱ्या अर्थाने काँग्रेसने पुन्हा कात टाकली, असे म्हणावे लागेल.

महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षातील काळात देशमुख यांनी जमेल तसा जिल्ह्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला. पण, या अडीच वर्षातील मंत्रीपद त्यांच्यासाठी आणि लातूर काँग्रेससाठी बुस्टर डोस ठरले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडी आणि देश पातळीवरील 'इंडिया' आघाडीने भाजपच्या सत्तेला आव्हान दिले आहे. दरम्यान, फोडाफोडी आणि केंद्रीय तपास यंत्रणाच्या दबावाखाली राज्यातील विशेषतः मराठवाड्यात काँग्रेसला मोठा फटका बसला.

sambhaji patil nilangekar amit deshmukh
Lok Sabha Election 2024 : भुमरे, जलील अन् खैरेंमध्ये तिरंगी लढत; 'हे' मतदार ठरवणार संभाजीनगरचा खासदार

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला असेल तर तो लातूरच्या देशमुखांना. तसं बघितलं तर भाजपमध्ये प्रवेश करू पाहणाऱ्या मराठवाड्यातील काँग्रेस नेत्यांच्या यादीत लातूरच्या अमित आणि धिरज देशमुख ( Dheeraj Deshmukh ) या दोन भावांचे नाव आघाडीवर होते. पण, चव्हाणांच्या भाजपमधील एन्ट्रीने देशमुखांच्या प्रेवशाच्या चर्चा थंडावल्या.

राजकारणात अनुभवी असलेल्या आणि अमित-धिरज यांना पितृतुल्य असलेल्या काका माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी त्यांना न डगमगता आहे, तिथेच खंबीरपणे उभे राहा, असा सल्ला दिला आणि तो पुतण्यांनी ऐकला. त्यामुळे लातूर लोकसभा निवडणुकीत उमेदवार निवडीपासून ते त्याच्या कालच्या प्रचारापर्यंतची सगळी जबाबदारी ही देशमुख काका-पुतणे आणि त्यांच्या कुटुंबाने आपल्या खांद्यावर घेतल्याचे दिसून आले. शिवाजी काळगे यांना निवडून आणण्यासाठी जी मेहनत देशमुख कुटुंबाने घेतली ती पाहता खऱ्या अर्थाने काँग्रेस जिंकण्यासाठी लढल्याची चर्चा जिल्ह्यात होतांना दिसत आहे.

दुसरीकडे सुरवातीला लोकसभा उमेदवाराच्या निवड प्रक्रियेपासून ते संयुक्त बैठका, मेळाव्यांकडे पाठ फिरवणाऱ्या माजी मंत्री आमदार संभाजी पाटील-निलंगेकर यांनी वरिष्ठांच्या आदेशानंतर सूत्रे हाती घेतली. सोबतीला बंधू अरविंद निलंगेकर यांना घेऊन शेवटच्या टप्प्यात भाजपने प्रचारात आघाडी घेतली. अर्थात या प्रचाराला देशमुख-निलंगेकर संघर्षाची किनारही होती.

वैयक्तिक टीकेपासून ते लातूर जिल्ह्याच्या पाण्याचा प्रश्न, मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी, शेतीमालाचे पडलेले भाव आदी मुद्यांवर दोघेही एकमेकांवर तुटून पडले होते. रविवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. लातूरकरांनी देशमुख-निलंगेकर व त्यांच्या पक्षाचे विचार ऐकले आहेत. त्यामुळे मंगळवारी मतदानातून जो कौल लातूरकर देणार आहेत, त्यावरच जिल्ह्याचे नेतृत्व कोणाच्या हाती जाणार? याचाही फैसला होणार आहे.

( Edited By : Akshay Sabale )

sambhaji patil nilangekar amit deshmukh
Loksabha Election 2024 : उदंड जाहले पक्षांतर... राजकीय उड्यांनी आसमंत गजबजला !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com