Vikram Kale Sarkarnama
मराठवाडा

Vikram Kale : 'मी चार वेळा आमदार, सतीशभाऊंचीही आता चौथी टर्म, मग आमच्या नावासमोर 'नामदार' का लागत नाही'?

Marathwada Graduates Election: मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यानंतर विक्रम काळे यांनी दोघांच्या चौथ्या आमदारकीचा उल्लेख केला. मंत्रीपदाची संधी न मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

Jagdish Pansare

Marathwada Graduate Constituency Election News : मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस-महायुतीकडून सतीश चव्हाण यांना चौथ्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्या विजय संकल्प मेळाव्यात मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी भाषणाच्या शेवटी स्वत:च्या आणि सतीश चव्हाण यांच्या आमदारकीच्या कार्यकाळाची आठवण काढत खंत व्यक्त केली.

मराठवाडा पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघावर गेल्या अठरा ते पंचवीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मजबूत पकड आहे. अनुक्रमे सतीश चव्हाण, विक्रम काळे यांची ही चौथी टर्म आहे. आजच्या विजयी संकल्प मेळाव्यात विक्रम काळे यांनी गेल्या अठरा वर्षात सतीश चव्हाण आणि मला मंत्रीमंडळात संधी का मिळाली नाही? याबद्दल खंत व्यक्त केली.

राज्याच्या उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवार या सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीच्या कार्यक्रमामुळे येथे येऊ शकल्या नाहीत. अन्यथा त्यांना आम्ही हे विचारले असते, असे विक्रम काळे म्हणाले. संजय बनसोडे यांना आम्ही आमदार केले, त्यांना पहिल्याच टर्ममध्ये मंत्री होण्याची संधी मिळाली. पण माझ्या आणि सतीश चव्हाणांच्या नावासमोर 'ना' का लागत नाही? हे कळायला मार्ग नाही, असे काळे म्हणाले.

गेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा एका जाहीर कार्यक्रमातही विक्रम काळे यांनी अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आमच्यापैकी एकाला कोणाला तरी मंत्री करा? अशी गळ घातली होती. यावर सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात तो निर्णय, मोठे साहेब घेतील असे सांगत सुळे यांनी वेळ मारून नेली होती. मात्र चव्हाण, काळे यांचा मंत्रिमंडळातील समावेशाबद्दल अद्याप निर्णय झाला नाही. हीच मनातील सल विक्रम काळे यांनी सहा वर्षानंतर पुन्हा बोलून दाखवली.

सर्व शाळा शंभर टक्के अनुदानित करणार!

मराठवाडा व पदवीधर मतदारसंघात मी आणि सतीश चव्हाण एकत्रितपणे शिक्षक आणि पदवीधरांच्या प्रश्नासाठी सातत्याने लढत आहोत. येत्या काळात सर्व शाळा या शंभर टक्के अनुदानित करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही विक्रम काळे यांनी सांगीतले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT