Shivsena News : शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे यांच्या कारचे ड्रायव्हर जावेद रसुल शेख याने हिबानामाच्या आधारे 23 एकर जमीन लाटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पुन्हा एकदा झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेत आरोप केले. तसेच काही कागदपत्र समोर आणत महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणीही केली.
यावर शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांनी मुंबईत विधिमंडळ परिसरात 'एबीपी माझा'शी बोलताना संताप व्यक्त करत अंबादास दानवे यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. दानवे यांचे विरोधी पक्षनेते पद गेले आहे, आता त्यांना पुर्वीसारखा प्रोटोकाॅल नाही, त्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. यापूर्वीही अशाच प्रकारचे आरोप आमच्या ड्रायव्हरवर करण्यात आले होते.
मुळात आमचा किंवा माझ्या ड्रायव्हरचा या हिबानामाशी कुठलाही दुरान्वये संबंध नाही. अंबादास दानवे यांनी आरोप केल्याचे समजताच मी माझा ड्रायव्हर जावेद रसुल याला फोन करून जटवाडा येथील जमीनीशी तुझा काही संबंध आहे का? त्या जागेचा हिबानामा तु्झ्या नावे आहे का? अशी विचारणा केली. तेव्हा त्याने स्पष्टपणे नकार देत असा कुठलाही हिबानामा माझ्या नावे नसल्याचे सांगीतले आहे.
अंबादास दानवे ज्या जावेद शेखचा उल्लेख करत आहेत, तो कदाचित दुसरा कोणी असू शकतो. वारंवार भुमरे परिवाराला टारगेट करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातो. ते फक्त आरोप करतात, पण आतापर्यंत त्यांना एकही आरोप सिद्ध करता आलेला नाही. आताही हिबानामाच्या आधारे समृद्धी महामार्गालगतची साडे अकराशे कोटींची जमीन हडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. त्यांनी महसूल मंत्र्यांकडे सीआयडी चौकशीची मागणी केली आहे.
आमचीही मागणी आहे, की महसूल मंत्र्यांनी दानवे यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी. त्यात तथ्य आढळले नाही, तर मात्र अंबादास दानवे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी स्वतः या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे पत्र देऊन अंबादास दानवे यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत. आरोप खोटे ठरले तर दानवे यांच्यावरही गुन्हा दाखल केला जावा, अशीही मागणी आम्ही करणार असल्याचे विलास भुमरे यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.