

Marathwada Farmer News : रोजगार हमी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या विहिरींमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा प्रकार हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात समोर आला आहे. प्रत्यक्षात विहिरीचे काम न करता कागदोपत्री ते दाखवून लाखो रुपये अनुदान परस्पर उचलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सेनगाव तालुक्यातील पळशी शिवारातील शेतकरी रामचंद्र खडसे यांनी तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 2021- 22 मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत त्यांच्या गट क्रमांक 59 मधील शेतासाठी विहीर मंजूर झाली होती. मात्र प्रत्यक्षात काम न होता सुमारे 1 लाख 75 हजार 224 रुपयांची रक्कम मजुरांच्या नावावर उचलण्यात आल्याचे तपासात समोर आले.
याप्रकरणी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर नायब तहसीलदार मुकुंद वाघुंडे यांच्या पथकाने 20 फेब्रुवारी रोजी पाहणी केली होती. या पाहणीतून तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले होते. हा एक प्रकार समोर आल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनीही आपल्या प्रकरणांची चौकशी केली असता असाच प्रकार समोर आला. सयाबाई जगताप यांच्या नावावर दोन लाख 38 हजार, माजी सरपंच इंदुबाई खडसे यांच्या नावावर एक लाख 46 हजार, श्रीराम जगताप यांच्या नावावर एक लाख 66 हजार तर पांडुरंग खडसे यांच्या नावावर एक लाख 17 हजार रुपये परस्पर उचलण्यात आल्याचे चौकशीत समोर आले आहे.
याशिवाय राधाबाई होळपदे यांच्या नावावर दोन लाख छत्तीस हजार, पांडुरंग मारुती खडसे यांच्या नावावर एक लाख 79 हजार विहिरीचे अनुदान परस्पर उचलण्यात आले आहे. एकूण दहा शेतकऱ्यांची मिळून 17 लाख 15 हजार 167 रुपयांचा निधी परस्पर उचलण्यात आला आहे. याशिवाय जुन्या विहिरी नव्याने दाखवून 15 लाख 42 हजार 462 रूपयेही उचलण्यात आले आहेत.
काही शेतकऱ्यांनी स्वखर्चाने विहिरी पूर्ण करूनही अनुदान न मिळाल्याच्या तक्रारीही केल्या आहेत. या प्रकरणात जिल्हा प्रशासनाकडे ही तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणात सर्वात प्रथम तक्रार करणारे सेनगाव तालुक्यातील शेतकरी रामचंद्र खडसे यांनी आपल्या शेतात विहिरीचे काम झाले नसल्याचे नायब तहसीलदार नकुल वाघुंडे व त्यांच्यासोबत आलेल्या पथकातील सहकाऱ्यांना प्रत्यक्ष दाखवले. त्यानंतरच या घोटाळ्याची भिंग फुटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.