Vilas Ghule Death Case: विलास घुले हत्या प्रकरणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे सुपुत्र सौरभ सोनवणे यांच्या अटकेसाठी घुले कुटुंबिय आणि ग्रामस्थानी आज पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला. बीड-केज महामार्गावर टायर जाळून तब्बल चार तास रास्तारोको करण्यात आला. या रास्तारोकोमुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
विलास घुले खून प्रकरणातील आरोपी सौरभ सोनवणे याला तातडीने अटक करण्यात यावी आणि या प्रकरणाचा सीआयडीद्वारे सुरू असलेल्या तपासाची सद्यस्थिती लेखी स्वरूपात दिली जावी, या मागणीसाठी आज केज तालुक्यातील टाकळी फाटा येथे पुन्हा आंदोलन करण्यात आले.
विलास घुले यांच्या आक्रमक नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी बीड-केज राष्ट्रीय महामार्गावर तब्बल चार तास रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलकांनी महामार्गावर टायर पेटवून प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला. केज तालुक्यातील टाकळी फाटा येथील हॉटेल व्यावसायिक विलास घुले हे २१ जून २०२६ रोजी दोन गटांत सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेला असतांना त्यांचा पोटात धारदार चाकूने वार झाल्याने मृत्यू झाला होता.
याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला ९ जणांवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील पुरवणी जबाबात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याचे नाव आल्याने हे प्रकरण राज्यभरात तापले. घुले कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी खासदार पुत्राला अटक करण्याची आणि प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्याची मागणी केली.
विलास घुले यांची हत्या होऊन तीन महिने उलटूनही मुख्य सूत्रधार सौरभ सोनवणे अद्याप पोलिसांच्या जाळ्यात कसा सापडला नाही? असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. तपास सीआयडीकडे वर्ग झाल्यानंतर नक्की काय ठोस कार्यवाही झाली? याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती पीडित कुटुंबाला दिली जात नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.
या आंदोलनामुळे बीड-केज महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. एसटी बसेस, मालवाहतूक गाड्या आणि खासगी वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने घटनास्थळी पोलीस यंत्रणा आणि जमावामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. सुरवातीला सीआयडी तपासाची सद्यस्थिती आणि अटकेची मुदत लेखी स्वरूपात मिळेपर्यंत रस्ता सोडणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला होता.
मात्र, तहसीलदार आणि वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी तपासाबाबत योग्य ती कायदेशीर पावले उचलण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर तब्बल चार तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले. तरीही, मुख्य सूत्रधार सौरभ सोनवणे याला येत्या काही दिवसांत अटक न झाल्यास संपूर्ण बीड जिल्हा बंद पाडून अधिक तीव्र लढा उभारण्याचा इशारा घुले कुटुंबीयांनी दिला.
संतप्त जमावाने बीड-केज महामार्गाच्या मध्यभागीच जुने टायर आणून पेटवून दिले. ऐन महामार्गावर आगीच्या उंच ज्वाला आणि धूराचे लोट उठल्याने बंदोबस्तावर असलेल्या पोलीस प्रशासनाची घावपळ झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी तत्काळ धाव घेत पेटते टायर बाजूला केले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून घटनास्थळी अतिरिक्त पोलीस कुमक, दंगा नियंत्रण पथक आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून केजचे तहसीलदार गोगावणे यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसेच थेट बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून दिला. याशिवाय केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक चर्चा केली आणि मुख्य आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून लवकरच त्याला बेड्या ठोकल्या जातील, असे आश्वासन दिले.