Marathwada Political News : दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वैद्यकीय शिक्षण प्रवेशामध्ये मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याने बाजी मारली. शिक्षण क्षेत्रात लातूर पॅटर्नची चर्चा नेहमीच होते. दिवंगत विलासराव देशमुख हे जेव्हा राज्याचे शिक्षण मंत्री होते, तेव्हा ते शिक्षण मंत्री आहेत म्हणून लातूरच्या मुलांना यश मिळते, असा आरोप केला जायचा. परंतु जेव्हा विलासराव देशमुख दुसऱ्या खात्याचे मंत्री झाले आणि त्यानंतरही लातूर पॅटर्नने घवघवीत यश मिळवले, तेव्हा लातूर पॅटर्न हे बावनकशी सोनं असल्याचे ते म्हणाले होते.
मेडीकल प्रवेशात बाजी मारल्यानंतर पुन्हा एकदा लातूर (Latur) पॅटर्नची चर्चा शिक्षण क्षेत्रात सुरू झाली आहे. या निमित्ताने आमदार अमित देशमुख यांनी विलासराव देशमुख यांचा जु्ना व्हिडिओ पोस्ट करत लातूर पॅटर्न हे कसे बावनकशी सोनं आहे, हे सांगितले. यंदाच्या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेत लातूरच्या बाराशेहून अधिक विद्यार्थ्यांनी यश मिळवत आपले प्रवेश निश्चित केले आहेत. उर्वरित प्रवेश फेऱ्यांमधून आणखी किमान आठशे विद्यार्थ्यांना वैद्यकीयच्या विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळेल, असा विश्वास अमित देशमुख यांनी व्यक्त केला.
वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेत लातूर पॅटर्नचे यश यावर्षीही लक्षणीय असेच आहे. एमबीबीएस, बीडीएस अभ्यासक्रमाच्या पहिल्याच प्रवेश यादीत लातूरच्या 1203 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाचे एकूण 35 विद्यार्थ्यांचे एम्समध्ये प्रवेश निश्चित झाले आहेत. (Vilasrao Deshmukh) या प्रवेश प्रक्रियेच्या आणखी तीन फेऱ्या बाकी असून आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी व इतर पॅरामेडिकल प्रवेशाची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. यावरून लातूरचे किमान 2 हजार पेक्षा अधिक विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवतील हा विश्वास आहे.
फक्त वैद्यकीय शिक्षणाचे प्रवेशच नव्हेतर आयआयटी व इतर अभियांत्रिकी शिक्षण संस्था मधील प्रवेश, युपीएससी, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षा मधूनही घवघवीत यश मिळवून लातूर पॅटर्न आपले वेगळेपण सिद्ध करीत आहे. मागच्या वर्षात 10 वी बोर्ड परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 211 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले आहेत, त्यापैकी 113 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत. त्यापूर्वीच्या 2024 या शैक्षणिक वर्षात राज्यात 100% गुण मिळवणाऱ्या 187 पैकी 123 विद्यार्थी लातूर विभागातील होते.
2023 या शैक्षणिक वर्षात 100% गुण मिळवणाऱ्या राज्यातील 151 पैकी 108 विद्यार्थी लातूर विभागातील होते. एकंदरीत सर्वच कसोट्यावर लातूरचा शैक्षणिक पॅटर्न दरवर्षी उजळून निघतो आहे. लातूरच्या या शैक्षणिक यशात विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि परिश्रमाचा प्रमुख वाटा तर आहेच परंतु त्यासोबतच या विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षण संस्थाचालक तेथील कर्मचारी, येथील कोचिंग क्लासेस या सर्वांच्या परिश्रमाचा ही त्यात तेवढाच वाटा असल्याचे अमित देशमुख यांनी म्हटले आहे.
या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देतानाच लातूर येथील नागरिक तसेच सर्वच, राजकीय पक्षाचे नेते विविध संघटनांचे प्रतिनिधी या सर्वांनी लातूर मधील शांतता टिकवून ठेवून, शैक्षणिक वातावरणाला अनुकूल परिस्थिती निर्माण केलेली आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून लातूरचा शैक्षणिक पॅटर्न बावनकशी सोने म्हणून झळाळून निघतो आहे. भविष्यातही येथे शैक्षणिक पूरक सुविधा निर्माण करून हे शैक्षणिक वातावरण आपणा सर्वांना टिकवून ठेवायचे आहे, वाढवायचे आहे. त्यासाठी सर्वांचेच योगदान महत्त्वाचे ठरणार असल्याचे ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.