पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने झालेल्या दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे भाषणाला उठले असता त्यांच्या समर्थकांनी “डीएम”च्या घोषणा देत गोंधळ घातला.
मुंडेंनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले व घोषणाबाजीमुळे भाषणात व्यत्यय आल्याने नाराजी व्यक्त केली.
मेळाव्यात वाल्मिक कराडचे बॅनर झळकल्याने नव्या राजकीय चर्चांना सुरुवात झाली असून पंकजा मुंडेंवरही टीका झाली आहे.
Beed, 02 October : राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने भक्तिगडावर सुरू झालेल्या दसरा मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सलग दुसऱ्या वर्षी हजेरी लावली. माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्यानंतर ते भाषणाला उठले आणि डीएमऽ डीएमऽऽ अशी एकच घोषणाबाजी सुरू झाली. मुंडेंना बोलताही येईना, त्यामुळे ‘असलं तुम्ही केल्यामुळे, तुम्हाला माहीत नाही काय काय झालं...’ असे सूचक विधान त्यांनी केले.
बीड जिल्ह्यात भक्तिगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सुरू आहे. या मेळाव्याला पंकजा मुंडे, डॉ. प्रीतम मुंडे, धनंजय मुंडे (Dhananjay Munde), माजी मंत्री महादेव जानकर आणि इतर नेतेमंडळी उपस्थित आहेत. मेळाव्याच्या सुरूवातीला माजी खासदार प्रीतम मुंडे यांचे भाषण झाले, त्यानंतर माजी मंत्री जानकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
दसरा मेळाव्याला उपस्थित असलेल्या काही लोकांच्या हातात वाल्मिक कराड (Walmik Karad) याचे बॅनर होते. त्या बॅनरवर ‘युई सपोर्ट वाल्मिकअण्णा’ असा आशय होता. त्यावरून राज्यात चर्चेला उधाण आले आहे. पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडचे बॅनर झळकल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. विशेषतः सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
दुसरीकडे, जानकर यांच्या भाषणानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे हे बोलायले उठले आणि एकच जल्लोष सुरू झाला. उपस्थितांमधून डीएमऽऽऽ डीएमऽ अशा घोषणा दिल्या जात होत्या. तो आवाज एवढा मोठा होता की, धनंजय मुंडे यांना बोलताही येईना. पण, मुंडे तसेच बोलत राहिले. मात्र, घोषणाबाजी कमी होत नसल्याने अखेर धनंजय मुंडेंनी त्या घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना कडक शब्दांत सुनावले.
असलं तुम्ही केल्यामुळे तुम्हाला माहिती नाही, काय काय झालं. तुम्हाला माहिती नाही....एक गोष्ट ऐकता का? मग शांत बसा, शांत बसा अशी विनंती केली. मात्र, कार्यकर्त्यांचा उत्साह काही कमी होत नव्हता. शेवटी धनंजय मुंडे यांनी त्या गोंधळताच भाषणाला सुरुवात केली. मात्र, या घोषणाबाजीची राज्यात चर्चा सुरू आहे.
मागच्या वर्षीच्या मेळाव्यात उल्लेख, आज विरोध
दरम्यान, मागील वर्षीच्या दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी ‘ज्याच्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पानही हालत नाही, असे वाल्मिकअण्णा’ असे विधान केले होते. मात्र, यावर्षी धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडचे बॅनरही झळकवू दिलं नाही. हे मात्र विशेष.
अजितदादांनी दिल्ला होता सल्ला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थित बीड रेल्वेचा लोर्कापण सोहळा झाला होता. त्या मेळाव्यात पंकजा मुंडे, धनंजय मुंडे भाषणाला आले की त्यांचे समर्थक विशिष्ट आवाज काढून घोषणाबाजी करायचं. त्याबाबत अजित पवार यांनी मुंडेंच्या कार्यकर्त्यांचे कान टोचले होते. तुमचे नेते भाषणाला उठले की तुम्ही वेगवेगळे आवाज काढता. हे काही बरोबर नाही. बाकीचे लोक कुठच्या कुठे गेले आहेत, असे सुनावले होते. त्यानंतरही आज पुन्हा कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडेंच्या नावाची घोषणाबाजी केली.
1 : दसरा मेळावा कोठे झाला?
बीड जिल्ह्यातील भक्तिगडावर.
प्रश्न 2 : धनंजय मुंडेंना भाषण करताना अडचण का आली?
त्यांच्या समर्थकांच्या “डीएम” घोषणाबाजीमुळे.
प्रश्न 3 : वाल्मिक कराडचे बॅनर लागल्यामुळे काय चर्चा रंगली?
पंकजा मुंडे यांच्या भूमिकेवर टीका आणि राजकीय चर्चांना सुरुवात झाली.
प्रश्न 4 : अजित पवार यांनी यापूर्वी काय सल्ला दिला होता?
नेत्यांच्या भाषणावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करू नये, असे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.