Chhatrapati Sambhajinagar News : पंचवीस वर्षाची सत्ता, आमदार-खासदार अन् मंत्री पदे भोगली पण शहरवासियांना पाणी देऊ शकले नाही. याला राजकीय नेते, लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे प्रशासन जबाबदार आहे, असा सूर आता सर्वसामान्यांमधून उमटू लागला आहे. लोक थेट जाब विचारू लागल्याने सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. गळ्याशी आलेले पाणी आता नाका-तोंडात जाण्याची वेळ आली आहे. तेव्हा कुठे सत्ताधारी आता हातपाय मारू लागले आहेत.
अशीच परिस्थिती निर्माण झाली असून दहा-बारा दिवसात एकदा नळाला पाणी येत असल्याने यावर शहरातील मंत्री अतुल सावे, राज्यसभेचे खासदार भागवत कराड (Dr.Bhagwat Karad) यांनी काल गुपचूप संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला भाजपाचे पदाधिकारीही उपस्थित होते. स्मार्ट सिटी कार्यालयात झालेल्या या बैठकीत चोवीस तास पाणी पुरवठ्यासाठी डिसेंबर 2025 चा नवा मुहूर्त काढण्यात आला आहे. तब्बल चार तास खल झाल्यानंतर नवीन जलवाहिनी योजना पूर्ण करण्यासाठी नवे वर्ष उजाडणार हे स्पष्ट झाले.
या बैठकीत कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यामुळेच पाणी योजना (Water Supply Issue) रखडल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचे समजते. वारंवार पाइपलाइन फुटणे, तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांना पाण्यासाठी नळाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे. 10 ते 15 दिवसांनी एकदा ते ही कमी दाबाने नळाला पाणी येते. त्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी मंत्री अतुल सावे यांनी भाजपच्या लोकप्रतिनिधींना सोबत घेत स्मार्ट सिटी कार्यालयात बैठक घेतली.
चार तास चालली बैठक
खासदार डॉ. भागवत कराड, आमदार संजय केणेकर यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महापालिका, महावितरण कंपनीचे अधिकारी, पाणीपुरवठा योजनेची कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. सुमारे साडेतीन ते चार तास ही बैठक सुरू होती. त्यात 900 मिलिमीटर व्यासाच्या पाणी पुरवठा योजनेसाठीच्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम जून महिन्यात पूर्ण होईल आणि जुलै महिन्यापासून या योजनेतून शहराला वाढीव पाणी मिळेल, असे आश्वासन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिले.
तर बैठकीच्या सुरवातीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कामाच्या प्रगतीचा व्हिडिओ दाखवला. यावर सावे, कराड यांनी आक्षेप घेताच 'ते राहू द्या, काम केव्हा पूर्ण करणार ते सांगा'असा थेट प्रश्न केला. त्यावर डिसेंबरमध्ये काम पूर्ण होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ऑगस्टमध्ये काम पूर्ण करा, असे सावे म्हणाले. पण, शेवटी डिसेंबर महिन्याची डेडलाइन काम पूर्ण करण्यासाठी देण्यात आली.
तुम्ही योजनेचे काम करून घेत आहात. मग कंत्राटदाराला मजूर वाढविण्याची सक्ती का करत नाहीत, असा प्रश्न सावे यांनी केला. मजूरांची संख्या वाढवून काम लवकर करून घेतले पाहिजे, असे निर्देश त्यांनी दिले. शहरातील पाण्याच्या टाकीची कामे जलद गतीने करा, त्याशिवाय पाण्याची साठवण क्षमता वाढणार नाही व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करता येणार नाही, असे सावे यावेळी म्हणाले. दरम्यान, आमदार संजय केणेकर बैठक अर्धवट सोडून गेले. ते पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी गेल्याचे सांगण्यात आले असले तरी नागरिकांच्या पाण्याच्या विषयापेक्षा केणेकरांना इतर कोणता विषय महत्त्वाचा होता, अशा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.