
Chhatrapati Sambhajinagar News : ऐन उन्हाळ्यात संभाजीनगरकरांच्या नळाला 12 ते 15 दिवसांनी पाणी येते. गेल्या वीस वर्षापासून ही परिस्थिती सत्ताधाऱ्यांना बदलता आलेली नाही. सध्या शहराचा पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडले आहेत. अशावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी संभाजीनगरचा पाणी प्रश्न चिघळण्याला स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन जबाबदार असल्याचे ठणकावून सांगितले.
छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांना शहराच्या पाणी प्रश्नाबद्दल विचारले असता त्यांनी आपले रोखठोक मत मांडले. कुठल्याही शहरामध्ये पिण्याचे पाणी हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा आणि मूलभूत गरजेचा असतो. योग्य नियोजन आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन जर स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी आणि महापालिकेतील प्रशासनाने पाणीपुरवठा योजना राबवल्या तर नागरिकांना त्याचा त्रास होत नाही. संभाजीनगर शहराचा वाढता व्याप पाहता या शहरासाठी दुसरी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना होणे गरजेचे होते.
मात्र ती इतक्या वर्षात का होऊ शकली नाही? याची माहिती आणि सध्या सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेचा आढावा मी विभागीय आयुक्तांकडून घेणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. (Chhatrapati Sambhajinagar) संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावरून विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 13 एप्रिल पासून शहरात 'लबाडांनो पाणी द्या' म्हणत जन आंदोलन सुरू केले आहे. येत्या 16 मे रोजी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत या जन आंदोलनाचा समारोप मोर्चा काढून होणार आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील पाणी प्रश्नाला स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला जबाबदार धरत खडे बोल सुनावल्याने याची एकच चर्चा सुरू झाली आहे. शहरासाठी राज्य सरकारने 2018 मध्ये 1680 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. केंद्र सरकारच्या अमृत योजनेत आता या पाणीपुरवठा योजनेचा समावेश झाल्यामुळे ती साडे सत्तावीसशे कोटींवर जाऊन पोहोचली आहे.
मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महापालिका, जिल्हा प्रशासन आणि या पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे ती रखडली आहे. सत्ताधारी पक्षाचे मंत्री, पालकमंत्री यांनी संभाजीनगरकरांना एप्रिल अखेरपर्यंत मुबलक पाणी मिळेल असे, आश्वासन देऊन वेळ मारून नेली. प्रत्यक्षात मात्र मे उजाडला तरी परिस्थिती जैसे थे आहे. आणखी वर्षभर तरी संभाजीनगरकरांना पाणी मिळणार नाही, अशी वस्तुस्थिती आहे.
गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्त कार्यालयातून या पाणीपुरवठा योजनेचा ऑनलाईन आढावा घेतला होता. या योजनेतील सर्व त्रुटी तातडीने दूर करून योजना पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी केल्या होत्या. मात्र अजूनही योजनेचे काम वेगाने पुढे सरकताना दिसत नाहीये. त्यातच आता अजित पवार यांनीही या पाणी प्रश्नावरून स्थानिक नेत्यांना आणि प्रशासनाला जबाबदार धरले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.