Renapur Market Committee News Sarkarnama
मराठवाडा

Renapur Market Committee : जे लातूरला, तेच रेणापूरला ; विलासराव- गोपीनाथ मुंडेंच्या मैत्रीची पुन्हा आठवण..

Dhiraj Deshmukh : विलासराव साहेबांनी मुंडे साहेबांना 'आता ही तुमची माणसं माझी माणसं झाली आहेत. तुम्ही निश्चिंत रहा,' असा शब्द दिला होता.

सरकारनामा ब्युरो

Latur : अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर रेणापूर येथील श्री रेणुकादेवी मातेचे दर्शन घेवून रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समिती (Renapur Market Committee) निवडणुकीतील काँग्रेस प्रणित कृषी विकास पॅनेलच्या प्रचाराचा लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. सर्वसामान्यांचा विकास हीच आमची एकमेव भूमिका आणि एकमेव ध्येय आहे, असे सांगून कृषी विकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांना भरभरून आशीर्वाद देत विजयी करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मतदारांशी संवाधतांना देशमुख म्हणाले, विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) साहेब आणि गोपीनाथराव मुंडे (Gopinath Munde) साहेब यांनी सामान्य लोकांच्या हिताला केंद्रबिदू मानून आयुष्यभर काम केले. मुंडे साहेबांच्या मतदारसंघाचा काही भाग लातूरला जोडला गेला तेव्हा विलासराव साहेबांनी मुंडे साहेबांना 'आता ही तुमची माणसं माझी माणसं झाली आहेत. (Latur) तुम्ही निश्चिंत रहा,' असा शब्द दिला होता. तो शब्द पाळण्याचे काम विलासराव देशमुख साहेबांनी केले.

यानिमित्ताने एकमेकांशी जोडले गेलेले बंध पुढे माजी दिलीपराव देशमुख, अमित देशमुख यांनी जपले, वृद्धिंगत केले. जे जे नवे लातूरला, ते ते रेणापूरला हवे, यानुसार दिलीपराव देशमुख यांनी साखर कारखाना, बाजार समिती, जिल्हा बँकेच्या माध्यमातून लातूर शहर व तालुक्याच्या विकासाबरोबर रेणापूर तालुक्याला उभे करण्याचे काम केले. शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रेणा साखर कारखाना उभारला.

येणाऱ्या काळातही रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा लौकिक आणखी वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या दिशेने एकेक पाऊल टाकत आहोत. रेणापूर बाजार समितीचे विस्तारीकरण, गोडाऊन बांधणी, शेतीमाल तारण योजना आदीच्या माध्यमातून मागील संचालक मंडळाने चांगले काम केले आहे. येणाऱ्या काळात आपली बाजारपेठ अधिक मजबूत करण्याबरोबरच नवीन पिकांना बाजार उपलब्ध करणे, रेशीम शेतीला प्रोत्साहन देवून त्यांचे मार्केट उभे करणे.

पानगाव येथे नवीन बाजारपेठ विकसित करणे, रेणापूर शहरात जनावरे व भाजीपाला याकरिता बाजारपेठेचा विस्तार करणे अशी विविध कामे आम्हाला करायची आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ होईल, त्यांना आपल्या शेतीमालासाठी सर्व सोयींयुक्त हक्काची बाजारपेठ मिळेल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे धिरज देशमुख यांनी सांगितले. कृषी विकास पॅनलमधील हमाल व मापाडी मतदारसंघातील बिनविरोध निवडून आलेले बाळकृष्ण खटाळ यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT