Crime in Nanded City
Crime in Nanded City Sarkarnama
मराठवाडा

Marathwada : नांदेडात चाललंय तरी काय ? खंडणीसाठी माजी मंत्र्याच्या घरात बंदुकधारी घुसला..

संतोष जोशी

नांदेड : व्यापाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या, उद्योजक, बांधकाम व्यावसायिकांना धमक्या आणि त्यातून हत्या यासारखे गंभीर प्रकार नांदेड (Nanded) शहर व जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढतच आहेत. शहरातील बिल्डर बियाणी यांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या झाल्यावर तर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Crime) यावर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलिस व राजकारण्यांना गुन्हेगारांनी पुन्हा एकदा आव्हान दिले आहे.

राज्याचे माजी मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डी.पी.सावंत यांच्या घरातच एक बंदुकधारी घुसल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. (Marathwada) ५० हजारांची खंडणी मागत या आरोपीने घरातील नोकराला बेदम मारहाण केल्याचे देखील समोर आले आहे. भरदिवसा दुपारी हा प्रकार घडल्यामुळे नांदेड शहर पुन्हा एकदा हादरून गेले आहे.

नांदेड शहरातील शिवाजीनगर भागात माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री डी. पी. सावंत यांचे निवासस्थान आहे. आज दुपारी अचानक एक बंदुकधारी त्यांच्या घरात घुसला आणि त्याने ५० हजारांची मागणी केली. यावेळी घरात असलेल्या नोकरालार देखील या गुंडाने मारहाण केली. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि आमदार अमर राजूरकर यांचे निवासस्थान देखील शेजारीच आहे. त्यामुळे आता नांदेडमधील मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांची घरे देखील सुरक्षित नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

सावंत यांच्या घरात घुसलेल्या बंदुकधारी गुंडाने कीचनमध्ये असलेल्या नोकरावर बंदुक रोखली व त्याच्याकडे ५० हजारांची खंडणी मागितली, त्याने विरोध करण्याचा प्रयत्न केला तर त्याला मारहाण करण्यात आली. घरात सुरू असलेला गोंधळ पाहून डी.पी.सावंत यांना काही तरी वाईट घडतयं याची कल्पना आली आणि त्यांनी आजुबाजुच्या लोकांना मदतीसाठी हाक मारली. आरडाओरड ऐकून पळून जाण्याच्या बेतात असलेल्या या गुंडाला लोकांच्या मदतीने पकडण्यात सावंत व इतरांना यश आले.

त्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देऊन त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. खंडणीसाठी घरात घुसलेला आरोपी हा मुळचा बीडचा असल्याची माहिती आहे. हा व्यक्ती सावंत यांच्याकडे आपल्या शेतीचा प्रश्न असल्याचे सांगत सकाळी अकरा वाजता त्यांच्या घरी आला होता. तेव्हा सावंत यांनी बिडचा प्रश्न आहे तु तिथेच जाऊन दाद माग असे त्याला सांगितले.

त्यानंतर अचानक किचनमध्ये येऊन त्याने जवळचे पिस्तुल काढून नोकरावर रोखले आणि त्याच्याकडे ५० हजारांची मागणी करत त्याला मारहाण केली. दीड महिण्यापुर्वीच बिल्डर संजय बियाणी यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी अद्याप पोलिसांना सापडले नाहीत. त्यातच आता माजी मंत्र्याच्या घरात हा प्रकार घडल्याने शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT