Maratha Reservation News Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी काय केले ? समाजाच्या प्रश्नाने नेते घायाळ...

Maharashtra News : विशेषत: भाजपचे मंत्री, खासदार, आमदार यांना याचा सर्वाधिक फटका बसताना दिसतो आहे.

Jagdish Pansare

Marathwad Political News : मराठा आरक्षणाचे आंदोलन चांगले पेटले आहे. वर्षानुर्षे सत्ता उपभोगलेल्या नेत्यांना आता समाज रस्त्यावर उतरून जाब विचारू लागला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने मराठा आरक्षणाच्या लढ्याला आता अधिक बळ आले आहे. (Maratha Reservation News) समित्या, अहवाल आणि बैठका यापुढे आरक्षणाचा प्रश्न पुढे सरकत नाही. हताश तरुण मृत्यूला कवटाळत आहेत, या पार्श्वभूमीवर सत्तेचा उपभोग घेणाऱ्या सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांना आता समाजाच्या संतापाला सामोरे जावे लागत आहे.

विशेषत: भाजपचे (BJP) मंत्री, खासदार, आमदार यांना याचा सर्वाधिक फटका बसताना दिसतो आहे. इतकी वर्षे सत्ता भोगूनही मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, मग तुम्ही काय केले? असा सवाल नेत्यांना सध्या घायाळ करतो आहे. गेल्या दीड महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथून सुरू असलेल्या लढ्याचा निर्णायक टप्पा उद्या जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर (Marathwada) मराठवाड्यातील राजकीय नेत्यांना मराठा समाजाचा रोष सहन करावा लागत आहे.

मुंबईत मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या सुनील कावळे यांच्यावर काल छत्रपती संभाजीनगरातील मुकुंदवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) हे सांत्वनासाठी आले होते. परंतु इथे मराठा आरक्षणासाठी तुम्ही काय केले? खोटी सहानुभूती नको, इथून चालते व्हा, असे खडेबोल त्यांना संतप्त समाजाच्या तरुणांनी सुनावले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा समाजाला भाजपने आरक्षण दिले होते, ते मागच्या सरकारला टिकवता आले नाही, हे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्नही फसला. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बागडेंना तिथून जायला भाग पाडले. बागडेंनीही समयसूचकता दाखवत तिथून जाणे पसंत केले. बागडे यांच्या आधी जालन्यात `मेरी माटी मेरा अभिमान`, कार्यक्रमात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे या पिता-पुत्रांनाही विरोध झाला.

कार्यक्रम सुरू असलेल्या ठिकाणी मराठा कार्यकर्त्यांनी धाव घेत जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढचा अनर्थ टळला. दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारच्या कौशल्य विभागाच्या कार्यक्रमात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या परतूर मतदारसंघात असाच प्रकार घडला. मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सरकारी कुठलाही कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी भूमिका मराठा तरुणांनी घेतली आणि हे समजताच लोणीकरांनी कार्यक्रमाला जाणे टाळले.

बीडमध्ये भाजपच्या खासदार डाॅ. प्रीतम मुंडे यांना मतदारसंघातच काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. तत्पूर्वी माजी मुख्यमंत्री काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण यांना त्यांच्याच नांदेड जिल्ह्यात मराठा तरुणांनी आरक्षणासाठी काय केले? असा जाब विचारत काळे झेंडे दाखवून माघारी धाडले होते.

धाराशिवमध्ये शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांना उपोषणकर्त्यांनी `मराठा आरक्षणासाठी राजीनामा कधी देणार` ? असा सवाल केला होता. एकूणच मराठा आरक्षण आतापर्यंत का मिळू शकले नाही? याचे कुठेलही कारण किंवा सबब नेत्यांकडून ऐकण्याच्या मनस्थितीत मराठा समाज नाही, हेच या घटनांवरून स्पष्ट झाले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT