CM Eknath Shinde, Tanaji Sawant Sarkarnama
मराठवाडा

Eknath Shinde : ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री शिंदे काय गर्जना करणार ?

Political News : रखडलेला दौरा आता 7 फेब्रुवारीला तेरणा कारखान्यावर

Shital Waghmare

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्याच्या एकूण राजकीय घडामोडींचा केंद्र राहिलेल्या तेरणा शेतकरी साखर कारखान्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा ठरला आहे. मागील 10 जानेवारी रोजी ठरविण्यात आलेला दौरा अचानक रद्द झाला. तोच राजकीय दौरा आता 7 फेब्रुवारी रोजी अंतिम करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदा पक्षाचा संघटनात्मक मेळावा घेत आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री शिंदे काय गर्जना करणार ? याकडे दोन्ही सेनेतल्या सैनिकांचे लक्ष लागले आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनाही मुख्यमंत्र्यांसमोर आपली ताकद सिद्ध करावी लागणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात त्यांचा यापूर्वी एक वेळा दौरा झाला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता ते धाराशिव आणि तुळजापूर तालुक्यात आले होते. मुख्यमंत्रीपदाचा पदभार घेतल्यानंतर पक्षीय किंवा संघटनात्मक बांधणीसाठी शिंदे पहिल्यांदाच धाराशिव जिल्ह्यात दाखल होत आहेत.

शिंदे सेनेचे राज्यातील प्रमुख शिलेदार असलेल्या आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ शुगरकडे असलेल्या तेरणा शेतकरी साखर कारखान्याच्या प्रांगणात हा मेळावा होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्यात जिल्हाभरातील शिवसैनिकांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संवाद साधणार आहेत. त्या अनुषंगाने तेरणा कारखाना येथे शुक्रवारी जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्र्याच्या दिवसभराच्या कार्यक्रमाची नियोजन या बैठकीत करण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मेळाव्यासाठी जिल्हा आणि लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांना एकत्रित करण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले, असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता साळुंखे यांनी दिली. तेरणा शेतकरी सहकारी कारखान्यापासून उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे घर हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे खासदार ओमराजे यांच्या शिवे शेजारी असलेल्या तेरणा शेतकरी साखर कारखान्यातून एकनाथ शिंदे (Eknath shinde) नेमकी कोणती गर्जना करणार याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

काही नेत्यांचा होणार पक्षप्रवेश

पालकमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या नावे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी भावी खासदार अशा पद्धतीचे डिजिटल फ्लेक्स झळकले आहेत. त्यामुळे धाराशिवच्या लोकसभा जागेवरती शिंदे सेना या मेळाव्याच्या निमित्ताने दावा करणार का ? अशी चर्चा ही सध्या जिल्ह्यात सुरू आहे. तसेच या मेळाव्यात जिल्ह्यातील काही महत्वाच्या नेत्यांचा शिंदे सेनेत प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. ते नेते ठाकरे गटाचे की अन्य कोणत्या पक्षाचे हे गुलदस्त्यात आहे.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT