Beed Assembly Election 2024  Sarkarnama
मराठवाडा

Beed Assembly Constituency : क्षीरसागर काकांची अचानक `विड्राॅल` ; कोणत्या पुतण्याच्या खात्यात ताकद `डिपॉझिट` करणार ?

Which nephew will benefit from the retreat of Jayadat Kshirsagar? : छगन भुजबळ गटातील जयदत्त क्षीरसागर यांना कायम अजित पवार गटाच्या विरोधाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनाही क्षीरसागरांनी कधीही फारसा भाव दिलेला नाही.

Datta Deshmukh

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत बीड विधानसभा मतदार संघातून तीन काका पुतण्यांनी अर्ज दाखल केल्याने रंगत वाढली होती. मात्र, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी सोमवारी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दाखल केलेला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला. आता ते आपली राजकीय ताकद कोणत्या पुतण्याच्या मागे लावणार याकडे लक्ष लागले आहे. संदीप क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तर डॉ. योगेश क्षीरसागर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून रिंगणात आहेत.

जिल्ह्यातील एकेकाळी मातब्बर राजकीय घराण्यातील दिवंगत केशरबाई क्षीरसागर यांचा राजकीय वारसा चालविणाऱ्या जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) यांनी चार वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यांनी चौसाळा विधानसभा मतदार संघातून दोनदा तर बीड विधानसभा मतदार संघातून दोनदा विधानसभेत विजय मिळविला. उपमंत्री ते कॅबिनेट मंत्री अशी राजकीय कारकीर्द गाजवणारे जयदत्त क्षीरसागर एकेकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील प्रमुख ओबीसी नेते म्हणून ओळखले जात होते.

छगन भुजबळ गटातील जयदत्त क्षीरसागर यांना कायम अजित पवार गटाच्या विरोधाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनाही क्षीरसागरांनी कधीही फारसा भाव दिलेला नाही. पक्षातले सगळे नेते आपल्याला ‘दादा’ म्हणतात पण जयदत्त क्षीरसागर मात्र अजितराव म्हणतात असे खुद्द पवारांनी एका बीडच्या सभेत सांगीतले होते. असा राजकीय रुतबा असलेल्या क्षीरसागरांचे जिल्हाभरात राजकीय नेटवर्क आहे.

दरम्यान, मागच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमदेवार असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांचा पुतणे संदीप क्षीरसागर यांनी पराभव केला. (Beed News) मागच्या वर्षी त्यांचे दुसरे पुतणे डॉ. योगेश क्षीरसागर यांनीही जयदत्त क्षीरसागर यांची साथ सोडून धनंजय मुंडे यांचे नेतृत्व स्वीकारले. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेने माजी मंत्री क्षीरसागरांना पक्षातून काढून टाकले. त्यामुळे या निवडणुकीत ते अपक्ष रिंगणात उतरले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून संदीप क्षीरसागर तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. योगेश क्षीरसागर असे तीन काका - पुतणे रिंगणात होते. त्यामुळे विरोधत आता ‘क्षीरसागर मुक्त’ बीड अशा आरोळ्या सोशल मिडीयावरुन ठोकत असतानाच उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी काका जयदत्त क्षीरसागर यांनी आपला अपक्ष अर्ज माघारी घेतला. आता त्यांचे दोन्ही पुतणे रिंगणात आहेत. दोघांनी क्षीरसागरांना समान राजकीय घाव घातलेले आहेत. तरी आता ते आपली राजकीय ताकद कोणाच्या मागे लावतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT