Maharashtra Politics: राजकारणात काका-पुतण्या अंक नवा नाही. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याविरोधात संदीप क्षीरसागर यांनी बंड पुकारले आणि ते यशस्वीही झाले. पुढे दुसरे पुतणे डॉ. योगेश क्षीरसागर यांनीही जयदत्त क्षीरसागरांची साथ सोडत पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे नेतृत्व स्वीकारले आहे.
मात्र, आता एक पुतण्या माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या साथीला मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. हा पुतण्या दुसरा तिसरा कोणी नसून आमदार संदीप क्षीरसागर यांचा सख्खा भाऊ आहे.
क्षीरसागर कुटुंबीयांत दिवंगत लोकनेत्या केशरकाकू क्षीरसागर यांच्यानंतर त्यांचे थोरले चिरंजीव जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) विधीमंडळाचे राजकारण करत. त्यांच्या नेतृत्वाखालीच दुसरे बंधू रवींद्र क्षीरसागर जिल्हा परिषद व गजानन कारखाना सांभाळत. तिसरे बंधू डॉ. भारतभूषण क्षीरसागर बीड नगरपालिकेचे राजकारण करत.
कालांतराने संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) देखील पंचायत समितीच्या माध्यमातून राजकारणात उतरले. पाच वर्षे पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे सभापती म्हणून काम केल्यानंतर त्यांना नगर पालिकेच्या कार्यक्षेत्रातही रस वाटू लागला.
2017 सालच्या नगर पालिका निवडणुकीत आपल्या काही समर्थकांना उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांनी काका डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना गळ घातली. पण, त्यांनी कुटुंबात ठरलेल्या अलिखीत (आपापले कार्यक्षेत्र) नियमावर बोट ठेवले. त्यामुळे संदीप क्षीरसागर यांनी काकू-नाना आघाडी स्थापन करत जयदत्त क्षीरसागर व डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या विरोधात राजकीय बंड पुकारले.
नगराध्यक्षपदासाठी डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या विरोधात वडील रवींद्र क्षीरसागरांना निवडणुक रिंगणात उतरवले. तर, धाकटे बंधू हेमंत क्षीरसागर नगरसेवक पदासाठी उमेदवार होते. या निवडणुकीत त्यांच्या वडिलांचा पराभव झाला.
परंतु, नगरसेवक म्हणून बंधूसह त्यांचे समर्थक नगरसेवकही विजयी झाले. 'एमआयएम'च्या नगरसेवकांना फोडून त्यांनी बंधू हेमंत क्षीरसागर यांना उपनगराध्यक्ष केले. जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकीत देखील संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील काकू-नाना आघाडी यशस्वी ठरली.
विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना चित केले. दरम्यान, नगर पालिका कार्यक्षेत्रात सक्रिय होत असलेले डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे चिरंजीव डॉ. योगेश क्षीरसागर यांनीही मागच्या वर्षी जयदत्त क्षीरसागर यांची साथ सोडली. त्यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे नेतृत्व स्वीकारत बीड विधानसभा अध्यक्षपदाच्या राजकीय वाटचाल सुरु ठेवली आहे.
दरम्यान, याचवेळेला आमदार संदीप क्षीरसागर यांचे धाकटे बंधू हेमंत क्षीरसागर आता जयदत्त क्षीरसागर यांच्या साथ देण्याच्या निर्णयाप्रत आल्याची माहिती आहे. मागच्या दोन वर्षांपासून राजकीय परिघापासून काहीसे दूर गेलेले हेमंत क्षीरसागर अलीकडे जयदत्त क्षीरसागर यांच्या चांगल्याच संपर्कात आहेत.
काही छोट्या कार्यक्रमांच्या निमित्ताने या काका-पुतण्यांच्या भेटी आणि संवादही चांगलाच वाढला आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत हेमंत क्षीरसागर आपल्या बंधूच्या विरोधात काका जयदत्त क्षीरसागर यांच्यासाठी काम करताना दिसतील, असे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.