Latur Rural Assembly Constituency News Sarkarnama
मराठवाडा

Latur Rural Assembly Constituency : धीरज देशमुख यांना टक्कर देण्यासाठी भाजपमध्ये चढाओढ

Who will challenge Dheeraj Deshmukh from BJP in Latur Rural? : सध्या आमदार असलेल्या कराड यांच्याऐवजी दुसऱ्या कुणाला संधी द्या, असा सूर स्थानिक भाजपच्या नेत्यांनी लावला आहे. यातूनच माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर, त्यांचे चिरंजीव कपिल पाटील यांची इच्छुक उमेदवारांमध्ये एन्ट्री झाली आहे.

Jagdish Pansare

सुधाकर दहिफळे

Latur BJP News : विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सगळेच पक्ष लागले आहेत. काँग्रेस महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीतील विजयाचे टॉनिक घेऊन विधानसभेत जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात महायुतीला धोबीपछाड देण्याच्या उद्देशाने मैदानात उतरली आहे. लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या दोन मतदारसंघावर काँग्रेसचे विशेष लक्ष असणार आहे. कारण या दोन्ही मतदारसंघात अनुक्रमे अमित देशमुख व त्यांचे बंधू धीरज देशमुख हे निवडणूक लढवतात.

या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजप कोणाला उमेदवारी देणार? याची उत्सुकता लागली आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांना टक्कर देण्यासाठी भाजपमधील इच्छुकांमध्ये अक्षरशः स्पर्धा लागली आहे. भाजपचे जिल्ह्यातील नेते व विधान परिषदेतील आमदार रमेशअप्पा कराड यांनी तर स्वतःची उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. मीच उमेदवार असे समजून कामाला लागा, असे आदेश त्यांनी आपल्या समर्थकांना देत मतदार संघात बैठकांचा धडाका सुरू केला आहे.

तर दुसरीकडे सध्या आमदार असलेल्या कराड यांच्याऐवजी दुसऱ्या कुणाला संधी द्या, असा सूर स्थानिक भाजपच्या नेत्यांनी लावला आहे. यातूनच माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर, त्यांचे चिरंजीव अजितसिंह पाटील यांची इच्छुक उमेदवारांमध्ये एन्ट्री झाली आहे. पक्षातूनच स्पर्धा सुरू झाल्याने राज्य पातळीवर वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असतानाच आज माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे कधीकाळी स्वीय सहाय्यक राहिलेले प्रशासकीय सेवेतील तहसीलदार, उपजिल्हाधिकारी अशी पदे भूषवलेले शंकरअप्पा भिसे यांनी आज भाजपचे आमदार रमेशअप्पा कराड यांची भेट घेतली.

लातूर मधील प्रयाग निवासस्थानी झालेल्या या भेटीत बराच राजकीय खल झाल्याची चर्चा आहे. लातूर ग्रामीणच्या उमेदवारीवरून पक्षात जोरदार तयारी सुरू असताना भिसे यांनी घेतलेल्या या भेटीचे अनेक अर्थ काढले जात आहेत. (Latur) 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर रमेशअप्पा कराड यांच्यावर त्यांनी निवडणूक सोडली होती, असा आरोप करण्यात आला होता. 2024 ला मात्र गेल्या वेळची चूक होऊ देणार नाही, असा शब्द कराड यांनी वरिष्ठ नेत्यांना देत उमेदवारीवर दावा सांगितल्याची चर्चा आहे.

मात्र विधान परिषदेची दोन वर्ष बाकी असताना कराड यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात वरिष्ठ नेत्यांना फारसा रस दिसत नाही. अशावेळी कराड यांना राजकीय दृष्ट्या अडचणीचा ठरणार नाही, असा उमेदवार देण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याची चर्चा आहे. या रणनितीचा भाग म्हणूनच भिसे यांनी रमेशअप्पा कराड यांची त्यांच्या घरी जाऊन घेतलेल्या भेटीकडे पाहिले जाते.

1995 च्या विधानसभा निवडणुकीत विलासराव देशमुख यांचा पराभव करणारे आणि आता भाजपमध्ये असलेले शिवाजीराव पाटील कव्हेकर यांना पक्षाने उमेदवारी दिली तर त्यांचे राजकीय पुनर्वसन होऊन भविष्यात ते कराड यांना डोकेदुखी ठरू शकतात. अशावेळी नव्या चेहऱ्याला संधी देऊन आपले राजकीय वजन वाढवण्याचा प्रयत्न कराड करतात का? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. शंकरअप्पा भिसे यांनी कराड यांची घेतलेली भेट निश्चितच राजकीय असणार आहे.

विधानसभा निवडणूक महिनाभरावर आलेली असताना शंकरअप्पा भिसे लातूर ग्रामीण मधून नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत. कधीकाळी भिसे यांच्यासाठी विलासराव देशमुख यांचा शब्द प्रमाण मानणाऱ्या भिसे यांनी आता थेट विरोधकांच्या तंबूत शिरून विद्यमान काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांनाच आव्हान देण्याची तयारी सुरू केल्याचे बोलले जाते.

येत्या आठवड्याभरात भाजपची विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या आधीच भिसे यांनी कराड यांची भेट घेत फिल्डिंग लावल्याचे दिसते. कराड, कव्हेकर, कपिल पाटील कव्हेकर यांच्यानंतर आता भाजपमध्ये लातूर ग्रामीण साठी तिसऱ्या भिडूची एन्ट्री झाल्याने निवडणुकीची रंगत अधिकच वाढणार आहे.

कोण आहेत भिसे ?

शंकरअप्पा भिसे सुरुवातीला तहसीलदार, त्यानंतर उपजिल्हाधिकारी, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त व विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांचे स्वीय सहाय्यक होते. ते मूळचे भोकरंबा तालुका रेनापुर येथील रहिवासी असून माजी आमदार त्रिंबक नाना भिसे यांचे ज्येष्ठ बंधू आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भिसे यांचे चांगले संबंध असल्याचे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT