Abdul Sattar, Aditya Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Shivsena UBT News : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सिल्लोडचा दौरा का टाळत आहेत ?

Why Thackeray avoiding Abdul Sattar's sillod tour ? : विशेष म्हणजे या आधी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपल्या शिवसंकल्प मेळाव्यातून अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडला वगळले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सिल्लोडला जायला घाबरतात का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Jagdish Pansare

Shivsena UBT News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे आज दोन दिवसांच्या संभाजीनगर दौऱ्यावर आले आहेत. नियोजनानुसार आदित्य ठाकरे दुपारीच शहरात येणार होते. त्यानंतर सिल्लोड येथे शिवसंकल्प मेळावा घेऊन ते संभाजीनगर येथील मेळाव्याला हजेरी लावणार होते. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी तशी माहिती कळवली होती. मात्र सिल्लोड येथील मेळावा अचानक रद्द करण्यात आला.

आता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सायंकाळी थेट साडेसात वाजता संभाजीनगरात दाखल होऊन शहरातील मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड- सोयगाव मतदार संघातील मेळावा रद्द केल्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे आजच अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथील आपल्या संपर्क कार्यालय समोर रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते.

या मेळाव्याला तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. आदित्य ठाकरे शिव संकल्प मेळाव्यासाठी सिल्लोडला येणार म्हणून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मोठी तयारी केली होती. मात्र हा मेळावा रद्द झाल्याने शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. आदित्य ठाकरे आपल्या संभाजीनगर दौऱ्याची सुरुवात अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातून करणार असल्याने त्यांच्या या दौऱ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

विशेष म्हणजे या आधी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपल्या शिवसंकल्प मेळाव्यातून अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या सिल्लोडला वगळले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सिल्लोडला जायला घाबरतात का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

उद्धव ठाकरे यांनी सिल्लोड मध्ये त्यांच्यासाठी प्रचार सभा घेतली होती. राज्यात त्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले, त्या मंत्रीमंडळात ठाकरेंनी अब्दुल सत्तार यांना राज्यमंत्री केले होते. मात्र राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत झालेल्या बंडात सत्तार सहभागी झाले आणि त्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडायला हातभार लावला.

शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या अब्दुल सत्तार यांना त्यांच्याच मतदारसंघात जाऊन आदित्य ठाकरे कसे आव्हान देतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असतानाच आदित्य ठाकरे यांनी सिल्लोडला जाणे टाळले. एकीकडे शिवसेना नेते अंबादास दानवे सिल्लोड- सोयगाव मतदार संघात अब्दुल सत्तार यांच्या विरोधात उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे नेते मात्र सिल्लोडला जाणे टाळत असल्यामुळे नेमकी सत्तार यांच्या बाबतीत शिवसेनेची भूमिका काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT