Omraje Nimbalkar Sarkarnama
मराठवाडा

Omraje Nimbalkar : ओमराजेंनी उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? संजय राऊतांनी यादीच वाचली...

Uddhav Thackeray Dharashiv Tour : धाराशिवमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमदार कैलास पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याची भूमिका पुन्हा स्पष्ट केली. संजय राऊत यांनी त्यांच्या निष्ठेचे कौतुक केले.

Vijaykumar Dudhale

Dharashiv, 28 June : धाराशिवमध्ये ऑपेरशन तुडवा सुरू झालं आहे आणि ते या ठिकाणी सक्सेस होणार आहे. आमदार कैलास पाटील यांनी शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, असे सांगितलं आहे. त्याबद्दल आम्ही सगळे त्यांचे आभारी आहोत, असा निष्ठावंत आमदार शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना मिळालेला आहे, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी आमदार कैलास पाटील यांचे कौतुक केले.

ते म्हणाले, हा जो गद्दार (ओमराजेंचा उल्लेख) याला मी भामटा आणि सोंगाड्या म्हणतो. कारण याने एवढी सोंगं आणि भामटेगिरी केली. प्रत्येक भाषणात तो म्हणायचा, ‘मी २००६ मध्ये ग्रामपंचायतीचा सदस्यसुद्धा नव्हतो. त्या वेळी अत्यंत कठीण परिस्थितीत उद्धव ठाकरेंनी माझा हात पकडला. मला एक वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार केलं. अशा परिस्थितीत मी पद आणि पैशासाठी उद्धव ठाकरे यांना कधीही सोडणार नाही,’ असे तो सांगत होता. पण आता काय केलंस गद्दारा, भामट्या...?

तुमचा हा धाराशिवचा खासदार शंभर कोटी रुपयांना विकला गेला आहे. उमरग्याच्या १०० शिवसैनिकांनी पत्रक काढून सांगितलं आहे की, आमच्या १०० जणांच्या किडन्या विकतो आणि तुम्हाला पैसे देतो. पण तू शिवसेना सोडू नको. ही निष्ठा आहे. किडन्या विकून शिवसैनिक त्याला पैसे द्यायला तयार झाले आहेत, तरी तो गेला, असेही राऊतांनी नमूद केले.

त्यांनी सांगितले, शिवसेनेने त्याला आमदार, खासदार केले. ठाकरे कुटुंबाचं आणि शिवसैनिकांचं प्रेम मिळालं. तू खासदार काही तुझ्या ताकदीवर आणि हिमतीवर झालेला नाही. या हजारो शिवसैनिकांनी तुझ्यासाठी कष्ट आणि परिश्रम घेतले. त्यागसुद्धा साधा केलेला नाही. अनेक शिवसैनिकांनी प्राणाचं बलिदान करून याला खासदार केलं आहे.

समाधान पाटलाची हत्या कोणी केली?

भूम तालुक्यातील पाटसांगवी गावातील शिवसैनिक समाधान पाटील यांची ७ मे २०२४ रोजी मतदान केंद्राच्या बाहेर हत्या झाली. ती हत्या कोणी केली? ती हत्या शिंदेंच्या गुंडांनी केली होती आणि तो खासदार आता मारेकऱ्यांच्या गटात जाऊन बसला आहे. लाज वाटली पाहिजे. पक्ष सोडण्यापूर्वी तू समाधान पाटलाच्या आत्म्याला विचारलं का पक्ष सोडू का म्हणून? असा हा भामटा, सोंगाड्या...त्याला धाराशिवच्या रस्त्यावर फिरु देऊ नका, असा सल्लाही त्यांनी शिवसैनिकांना दिला.

ते म्हणाले, हा भामटा शिवसेना सोडून गेल्याची अनेक कारणं दिली जातात. पण तो म्हणतो की, मी विकासासाठी गेलो, कोणाचा विकास? दोन वेळा खासदार, एक वेळा आमदार आहे, काय विकास केला? धाराशिवचं दुबई, कॅनडा की सिंगापूर केलं. याने काहीही केलं नाही.

हा भामटा उद्धव ठाकरेंना सोडून का गेला तर आता ऐका...कारण त्याच्या बॅंका, पतसंस्था. त्याने आणि त्याच्या कुटुंबाने प्रचंड भ्रष्टाचार केला. आतातर मला असंही वाटतंय की, त्याच्या वडिलांचा जो खून झाला, त्या खूनामागेसुद्धा वेगळं रहस्य आहे, असा गौप्यस्फोटही राऊतांनी केला.

ते म्हणाले, हा गेला कारण पवनराजे मल्टिस्टेट कंपनीने धाराशिवमध्ये ५०० कोटींचे प्लॉट खरेदी केले आणि त्याची ईडी चौकशी लागली. ईडीचे लोक त्याच्याकडे चौकशीला आले आणि तो घाबरून शिंदे गटात गेला आहे. त्याने आपल्या वडिलांच्या नावाने असलेल्या मल्टिस्टेटमध्ये गरिबांच्या नावाने खाते उघडून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला आहे.

तेरणा कारखान्यातील भंगार विकून त्यांनी पैसा खाल्ला आहे, असे अनेक गुन्हे केले म्हणून या सगळ्यांची चौकशी लागली, त्यामुळे हा डरपोक, सोंगाड्या पक्ष सोडून पळून गेला. आम्ही १५-२० वर्षे एका सापाला दूध पाजलं. पण आता त्या सापाचा फणा ठेचण्याची वेळ आली आहे आणि शिवसैनिक ते ठेचल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वासही संजय राऊतांनी बोलून दाखवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT