Rahul Patil : बंडू जाधवांवर हल्लाबोल करत राहुल पाटलांनी ठाकरेंसमोरच सांगितली पक्षाची चूक; दिला 'हा' महत्वाचा शब्दही...

Uddhav Thackeray Parbhani Tour : परभणीतील उद्धव ठाकरे यांच्या सभेत आमदार राहुल पाटील यांनी खासदार बंडू जाधव यांच्यावर टीका केली. शिवसेना परभणीतील चारही विधानसभा जागा जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Uddhav Thackeray-Rahul Patil
Uddhav Thackeray-Rahul PatilSarkarnama
Published on
Updated on

Parbhani, 28 June : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची सभा आमदार राहुल पाटील यांनीच गाजवली. खासदार बंडू जाधव यांना धु धू धुताना ‘आपण चोर पाळले, हीसुद्धा आपली चूक झाली,’ असेही त्यांनी ठाकरेंसमोरच सांगून टाकलं. तसेच, इथला खासदार गेला तरी जाऊ द्या; पण परभणीचे चारही आमदार शिवसेनेनेच निवडून आणू, असा शब्दही आमदार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

परभणीच्या सभेत आमदार पाटील बोलत होते. ते म्हणाले, जाहीर सभेला लाजवेल, असा प्रतिसाद आपल्या मेळाव्याला लाभला आहे, त्यामुळे आपल्या लक्षात आलं असेल की, गेलेले गद्दार हे चोर होते आणि आपण चोर पळाले, ही सुद्धा आपली चूक झालेली आहे. ज्यांनी गद्दारी केली आहे, त्यांना लोक म्हणतात बंडखोर. पण मी म्हणतोय ते गद्दारच आहेत.

उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम या सहा खासदारांनी केले आहे आणि आम्ही लोकांच्या कामासाठी गेलो आहोत, असे ते सांगत आहेत. तुम्ही स्वतःच्या कामासाठी गेलात की जनतेच्या?, हे सर्वांना माहिती आहे. आता तुमचं काम झालं ना? तुम्हाला हात जोडून विनंती की, तुम्ही आता जावा, आमचं काम करू नका. हे चोरांच्या टोळीत सामील झाले आहेत, असा हल्लाबोल राहुल पाटील यांनी केला.

ते म्हणाले, आपल्या खासदारांना दोनदा आमदार आणि तीनदा खासदार केले आहे. देशाच्या सर्वोच्च सभागृहात पोचवायचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. तीन तीन वेळा लोकसभेत पाठवूनही हा माणूस गद्दार होतो, म्हणजे हा माणूस कोण होता, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे.

Uddhav Thackeray-Rahul Patil
Shirur APMC Election : "शिरूर बाजार समितीवरील वर्चस्वासाठी कटके-पवार आमनेसामने; भाजपमध्ये 'आधे इधर, आधे उधर'

जाता जाता उद्धवसाहेब आणि आम्हाला सांगतो की, उद्धवसाहेबांनी असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. तुम्ही चोरी केली आणि चोर असल्यामुळे त्यावर पांघरूण घालण्याचे काम तुम्ही करत आहात. तसेच, ते असंही म्हणाले की, या राहुल पाटलाला मीच २०१४ मध्ये आमदार केलं. अरं २०१४ मध्ये उद्धव ठाकरेंनी ३५ इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यातून माझी उमेदवार म्हणून निवड केली. मला सर्वसामान्य शिवसैनिक आणि उद्धवसाहेबांनी आमदार केलंय, असेही राहुल पाटलांनी ठणकावून सांगितलं.

ते म्हणाले, तुम्ही २०१४ मध्ये विधानसभेच्या रिंगणातून तुम्ही पळून गेलात. पराभव होणार आहे, हे तुम्हाला माहिती होते, त्यामुळे तुम्ही लोकसभेला गेलात. २०१९ मध्ये म्हणाले राहुल पाटलांनी माझ्या विरोधात काम केलं. पण त्यांनी सुरेश नागरेसारखं भूत माझ्याविरोधात उभं केलं. ट्रॅक्टर घेऊन एक अपक्ष उमेदवार उभा केला, त्या ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकण्याचे काम कोणी केली. ट्रॅक्टरला पंक्चर कोणी केलं, हे सर्वांना माहिती आहे.

राहुल पाटलाला पाडायला खासदार दारोदारी फिरले

राहुल पाटलाला पाडायला एखादा अल्पसंख्याक उमेदवार मिळतोय हे पाहण्यासाठी २०२४ मध्ये हे खासदार दारोदारी फिरले. त्यांनी कोणतीही निवडणूक माझ्यासाठी सोपी केली नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करणारी ही माणसं आहेत. ज्यांनी मताला, पक्षाला विकलं त्यांनी जनतेचाही अपमान केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तुम्ही किती पैसे घेतले हे सर्वांना महितीय

ते म्हणाले, हे सहा जण म्हणतात की विकासाठी मी आम्ही सत्तेत गेलो. पण तुमच्यात धमक असेल तर विरोधात राहूनही तुम्हाला काम करता येतं. तुम्ही स्वार्थासाठी पळून गेला आहात, तुम्ही किती रुपये घेतले, हे सर्वांना माहिती आहे, त्यामुळे आम्हाला ज्ञान शिकवू नका. असल्या गोष्टी या परभणीत चालणार नाहीत.

Uddhav Thackeray-Rahul Patil
Om RajeNimbalkar Vs Uddhav Thackeray : ओम राजेनिंबाळकरांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्याचं ठरवलं! फक्त आक्रमक मेथड बदलणार...

ह्या राहुल पाटलाबरोबर आरे कारेची भाषा करू नका

तुम्ही काळजी करू नका साहेब, इथला खासदार गेला तरी इथले चारही आमदार निवडून आणण्याचं काम केल्याशिवाय राहणार नाही. आमच्या कोण अंगावर आलं, तर शिंगावर घेऊ, असे ते म्हणत आहेत. अरं यांची शिंग उपटून खुपसली नाही तर नाव राहुल पाटील लावणार नाही. तुम्ही शिंंगाची आणि आरे कारेची भाषा राहुल पाटलांबरोबर करू नका. ज्या गावच्या बोरी आहेत, त्याच गावच्या बाभळी आहेत, एवढं लक्षात ठेवा, असा इशाराही राहुल पाटील यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com