Nanded News : महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी थेट टक्कर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पहायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य उमेदवारांनी प्रचाराला सुरूवातही केली आहे. मराठवाड्यातील नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची उमेदवारी निश्चित समजली जाते. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून अशोक चव्हाण ? की मग अन्य कुणी हे लवकरच स्पष्ट होईल.
लोकसभा निवडणुकीपुर्वी कुठलाही उमेदवार किंवा नेता वातावरण निर्मिती करत असतो, तशीच काहीशी तयारी अशोक चव्हाण यांनी सुरू केली आहे. प्रताप पाटील चिखलीकरांवर थेट हल्ला चढवण्याची रणनिती चव्हाण यांनी आखल्याचे दिसते. भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर गेल्या पाच वर्षात संसदेत कधी बोलतांना दिसले का? असा सवाल करत यामागचे कारण चव्हाणांनी सांगितले.
चिखलीकरांना हिंदी आणि इंग्रजी येत नसल्याने ते कधी संसदेत बोलतच नाहीत, असा टोला चव्हाण यांनी नुकताच लगावला. चव्हाण यांनी थेट चिखलीकरांवर टीका करायला सुरूवात केल्यामुळे तेच यंदाही चिखलीकरांशी दोन हात करणार का? अशी चर्चा होत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. सार्वजनिक कार्यक्रम असो की पक्षाची सभा, बैठक, संधी मिळेल तेव्हा हे दोन्ही नेते एकमेकांचे वस्त्रहरण करतात.
नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात खासदार चिखलीकरांना हिंदी, इंग्रजी बोलता येत नाही, त्यामुळे ते गल्लीतच बोलतात संसदेत गप्प असतात, असे म्हणत खिल्ली उडवली. असं म्हणतात की दिल्लीत जम बसवायचा असेल तर हिंदी, इंग्रजी या भाषा चांगल्या प्रकारे बोलता आल्या पाहिजे. त्यासोबतच उत्कृष्ट असे संवाद कौशल्य व भाषेवर प्रभुत्व असेल तर संसदेत विविध प्रश्नांवर आवाज उठविता येतो. पण या दोन्ही बाबतीत आपल्या खासदारांचा आनंदी आनंद आहे, असा चिमटाही चव्हाण यांनी काढला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अर्धापुरात झालेल्या बैठकीत अशोक चव्हाण (Ashok chavan) यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपच्या सोशल मीडियावरील चुकीच्या पोस्टला सडेतोड उत्तर द्या, कोणत्याही प्रकाराच्या भुलथापांना बळी पडू नका, असे आवाहन केले. आम्ही गावांच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकत नाही. खासदार मात्र चार-पाच लाखांचा निधी दिला तरी फोटो सोशल मीडियावर टाकतात. तसेच न केलेल्या कामांचे श्रेय घेण्यासाठी समोर येतात.
काँग्रेस (Congress) पक्षांत असतांना चिखलीकरांनी सर्व पदे भोगली आहेत. पक्ष सोडून गेल्यावर केवळ आम्हाला शिव्या देण्याचे काम करतात. असे केल्याने त्यांची राजकीय सोय होते, असेही चव्हाण म्हणाले. गेल्या काही दिवसापासून अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असा दावा चिखलीकरांकडून जाहीरपणे केला जातोय. चव्हाण यांनी वारंवार हा दावा खोडून काढला, मात्र अजूनही भाजपकडून दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. त्यामुळे संतापलेल्या चव्हाण यांनी आता थेट चिखलीकरांनाच लक्ष्य केल्याचे दिसते.
(Edited by Sachin waghmare)