Maharashtra Politics: नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप नुकतेच वाजले. या दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी येत्या महिनाभरात दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याचा दावा केला. महाराष्ट्रातील एक मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होणार, असे विधान करत त्यांनी एका नव्या चर्चेला तोंड फोडले. नागपूरचे हिवाळी अधिवेशन हे राज्यातील धक्कादायक घटनांसाठी ओळखले जाते. अशावेळी पृथ्वीराज बाबांनी (पृथ्वीराज चव्हाण) टाकलेला हा बाँम्ब खरा आहे की फुसका? हे स्पष्ट होण्यासाठी थोडी वाट पहावी लागणार आहे.
एक मात्र गेल्या काही काळात दिसून आले की विरोधक आणि सत्ताधारी महायुतीतील मित्र पक्षांनाही राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत पाठवण्याची घाई झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानावर स्वतः देवाभाऊंनी स्पष्टीकरण देत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विकासाकडे वाटचाल करत आहे. त्यांचे नेतृत्व खंबीर आहेत आणि तेच यापुढेही पंतप्रधान म्हणून कायम राहतील, असे सांगितले होते. त्यानंतरही नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या विषयाची चर्चा रंगली.
महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचे आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी तर थेट देवेंद्र फडणवीस हे देशाचे पंतप्रधान होऊ शकतात? असे विधान करत खळबळ उडवून दिली. फडणवीस हे ज्या पद्धतीने राज्याचे नेतृत्व करत आहेत, ते पाहता पृथ्वीराज बाबांनी महाराष्ट्रातील एक मराठी व्यक्ती येत्या महिनाभरात देशाचा पंतप्रधान होणार आहे हा केलेला दावा त्यांना काही ठोस माहिती असल्याशिवाय केला नसेल. ती व्यक्ती देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय दुसरी कोणी असू शकेल? असे मला वाटत नाही, असे सांगत या चर्चेला हवा दिली.
अब्दुल सत्तार हे माजी मंत्री आणि सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचे विद्यमान शिवसेना आमदार आहेत. सत्तार काँग्रेसमध्ये असताना त्यांचे पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी फारसे कधी जमले नाही. उलट मराठवाड्यात निवडणुक प्रचारासाठी वेळ दिला नाही, असा आरोप सत्तार यांनी ते काँग्रेसमध्ये असताना त्यांच्यावर केला होता. आता त्यांच्याच विधानाचा दाखला देत सत्तार यांनी नागपूरात महाराष्ट्रातून देशाच्या पंतप्रधान पदासाठी देवेंद्र फडणवीस हेच योग्य व्यक्ती असल्याचे सांगत या चर्चेत उडी घेतली आहे.
सत्तार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेताना त्यांचे कौतुक केले असले तरी यामागे त्यांचा स्वार्थही दडला असू शकतो. उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री राहिलेल्या अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेमध्ये झालेल्या बंडात एकनाथ शिंदे यांची साथ दिली होती. याचे बक्षिस म्हणून शिंदे यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारमध्ये सत्तार यांना कॅबिनेट पदी बढती मिळाली होती. कृषी सारखे महत्वाचे खाते सत्तार यांना मिळाल्यामुळे त्यांचा रुबाब वाढला होता.
मात्र 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वाधिक आमदारांसह नंबर एकचा पक्ष ठरला आणि एकनाथ शिंदे यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर फडणवीसांनी आपल्या मंत्रीमंडळात वादग्रस्त ठरलेल्या शिंदेच्या काही मंत्र्यांच्या नावावर फुली मारली होती. त्यात अब्दुल सत्तार यांचे नाव आघाडीवर होते. फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातून डावलले गेल्याची सल अब्दुल सत्तार यांच्या मनात अजूनही आहे. यातूनच त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचा आधार घेत देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जावे ही आपल्या मनातील सुप्त इच्छा तर जाहीर केली नसले ना? असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील एक मराठी माणूस महिनाभरात दिल्लीत पंतप्रधान होणार? या चर्चेला उधाण आले. वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीही राज्यात मुख्यमंत्री बदलणार, असे विधान करत या चर्चेला हवा देण्याचे काम केले. तर शिंदे यांच्या पक्षाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी थेट देवेंद्र फडणवीस हे देशाचे पंतप्रधान होऊ शकतात, असे म्हणत त्यांचे नावच घेतले. एकूणच विरोधक आणि महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेलाही देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत पाठवण्याची घाई झाल्याचे दिसते, अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.