Minister Abdul Sattar-Opposition Leader Ambadas Danve News Sarkarnama
मराठवाडा

मंत्र्यांना सुतगिरणी देतांना निकष का पाळले नाही ? दानवेंचा सत्तारांवर निशाणा..

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शेतकऱ्यांना मदत द्यायची म्हटलं की सरकारला निकष, नियमांची आठवण होते. मग मंत्र्यांच्या मतदारसंघात सुतगिरणी मंजुर करतांना, त्याला निधी देतांना निकष नियम का आठवत नाहीत? असा सवाल करत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर निशाणा साधला.

राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिल्लोड-सोयगांवचे आमदार व आता कृषीमंत्री असलेले अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील सुतगिरणीला मंजुरी देत निधी दिला होता. (Shivsena) हा निधी देतांना निकष पाळले गेले नाहीत, असा आरोप दानवे यांनी सभागृहात केला. (Marathwada) यावेळी त्यांनी सिल्लोड आणि मंत्री असा उल्लेख केल्याने अब्दुल सत्तार उभे राहिले आणि त्यांनी दानवे यांना प्रत्युत्तर देण्याचाही प्रयत्न केला.

यावेळी दोघांमध्ये सभागृहात काही काळ तुतूमैमै देखील झाली. राज्यातील सत्तातंरानंतरचे पहिलेच पावसाळी अधिवेशन हे आरोप-प्रत्यारोपाने चांगलेच गाजते आहे. शिंदे गटाच्या मंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न शिवसेना व राष्ट्रवादीकडून सातत्याने होतांना दिसतो. त्यातच विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी शिवसेनेने अंबादास दानवे यांची नियुक्ती केल्याने वरच्या सभागृहात देखील सत्ताधारी मंत्री आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होतांना दिसत आहे.

शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे अशी मागणी करत असतांना अंबादास दानवे यांनी सत्तार यांच्या मतदारसंघात मंजुर झालेल्या सुतगिरणी व त्याला मिळालेल्या निधीचा उल्लेख करत निकष कसे पायदळी तुडवले गेले हे सभागृहात मांडण्याचा प्रयत्न केला.

दानवे म्हणाले, शेतकऱ्यांना मदत करायची म्हटलं की सरकार एनडीआरएफचे निकष, नियम सांगते. मात्र सिल्लोडमध्ये मंत्र्यांच्या मतदारसंघात सुतगिरणी मंजुर करून तिला कोट्यावधींचा निधी देतांना निकष, नियमांचा तुम्हाला विसर पडला होता का?

यावर सभागृहात उपस्थितीत असलेल्या कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आक्षेप घेत तुमच्या पोटात का गोळा उठला? अशी विचारणा केली. त्यावर अजून एक नाही दहा सुतगिरण्या तुम्हाला मिळाल्या तरी आमची काहीच हरकत नाही. पण मग निकष फक्त शेतकऱ्यांनाच का? असा पलवटवार केला.

सत्तार यांनी देखील उभे राहून तुम्ही माझ्या मतदारसंघाचा आणि मंत्री म्हणून माझा उल्लेख केला म्हणून मी बोलतो आहे. सुतगिरणी का रखडली होती हे तुम्ही तुमच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विचारा, असा टोला देखील दानवेंना लगावला. त्यानंतर सभापती निलम गोऱ्हे यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT