Ashok Chavan-Shrijaya Chavan News Sarkarnama
मराठवाडा

Who is heir of Ashok Chavan : पक्षाने लोकसभेची गळ घातली, तर भोकरमधून अशोक चव्हाण मुलगी श्रीजयाला `लिफ्ट` देणार ?

Jagdish Pansare

Nanded Political News : नांदेड जिल्ह्याला चव्हाण कुटुंबीयांमुळे चार वेळा राज्याचे नेतृत्व करण्याचा मान मिळाला. दिवंगत डॉ. शंकरराव चव्हाण दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच केंद्रीय गृहमंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. (Nanded News) त्यानंतर अशोक चव्हाण हेही दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. नांदेड जिल्ह्याचे राजकारण गेली पाच दशके चव्हाण कुटुंबाच्या भोवताली फिरलेले दिसून येते. शंकरराव चव्हाण यांचा राजकीय वारसा सक्षमपणे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सांभाळत आहेत.

पण आगामी काळात अशोक चव्हाणांना (Ashok Chavan) पक्षनेतृत्वाने दिल्लीत पाठवले, तर राज्यातील त्यांचा राजकीय वारसा पुढे कोण चालवणार? हा विषय राजकीय वर्तुळात सध्या चर्चिला जात आहे. (Congress) मराठवाड्यातील काही राजकीय नेत्यांनी आपल्या वारसांना राजकारणात आणून यशस्वी केला आहे. दिवंगत विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे याची दुसरी पिढी राजकारणात यशस्वी होताना दिसत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपली कन्या श्रीजया चव्हाण यांना गेल्या दीड ते दोन वर्षांपासून राजकारणात सक्रिय केले आहे.

तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेत श्रीजया चव्हाण यांचा सक्रिय सहभाग होता. काँग्रेस पक्षाच्या जाहिरातीत, शुभेच्छा फलकांवर श्रीजया चव्हाण यांचे छायाचित्र ठळकपणे दिसत होते. (Marathwada) त्यांच्यारूपाने चव्हाण कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात येणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा गड मानला जातो. काही निवडणुकांचे अपवाद वगळता काॅंग्रेसचे खासदार, आमदार निवडून आले आहेत.

शिवाय सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. शंकरराव चव्हाण यांनी राज्याचे दोन वेळा नेतृत्व केले आहे. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. राज्याच्या व देशाच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग जिल्ह्यात आहे. त्यांच्या सिंचन क्षेत्रातील योगदानाची महती आजही सांगितली जाते. त्यांच्यानंतर अशोक चव्हाण यांनी राज्याचे नेतृत्व केले. जिल्ह्यातील अनेक विकासकामांना त्यांच्या नेतृत्वामुळे गती मिळाली आहे. ते राज्यातील काॅंग्रेसचे प्रमुख नेते आहेत.

जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांनी आपल्या वारसांना राजकारणात सक्रिय केले आहे. यात खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मुलगा प्रवीण पाटील चिखलीकर, मुलगी प्रणित देवरे चिखलीकर राजकारणात सक्रिय आहेत, तर माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई जिल्हा परिषद सदस्य आहेत. अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनी भोकर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आता भारत जोडोमध्ये सक्रिय दिसलेल्या श्रीजया चव्हाण पूर्णपणे राजकारणात सक्रिय होऊन वडिलांचा वारसा पुढे चालवणार का? याची चर्चा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होताना दिसते आहे.

भोकर विधानसभा मतदारसंघात अशोक चव्हाण, अमिता चव्हाण यांचा प्रचारातही श्रीजया अॅक्टीव होत्या. तसेच अशोक चव्हाण यांनी सुरू केलेल्या अशोक चव्हाण सेवा सेतुची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. या सेवा सेतुच्या माध्यमातून भोकर विधानसभा मतदारसंघातील मतदारा़ंच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. येणाऱ्या काळात लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. मागच्या लोकसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी धक्कादायक पराभव केला.

या पराभवाची राज्यभर चर्चा झाली. पण सहा महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण हे सुमारे एक लाखाच्या मताधिक्याने निवडुण आले व मंत्री झाले. नांदेड लोकसभा मतदारसंघातून काॅंग्रेसचा उमेदवार कोण असेल? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. अशोक चव्हाण यांना काॅंग्रेसने वर्किंग कमिटीचे सदस्य केले आहे. त्यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी टाकली आहे. `इंडीया` आघाडीत नांदेड लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार कोण राहणार यावरुन भारतीय जनता पक्षाचा उमेदवार ठरवण्याची शक्यता आहे.

जर पक्षाने पुन्हा अशोक चव्हाण यांनाच उमेदवारी दिली तर भोकर विधानसभा मतदारसंघातून श्रीजया यांची थेट राजकारणात एन्ट्री होऊ शकते. लोकसभेसाठी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई मिनल पाटील खतगावकर, माजी आमदार वसंतराव चव्हाण, माजी मंत्री डी. पी. सावंत या नावांची चर्चा आहे.

या तीन नावांपैकी एक नावाचा किंवा इतर नावांचा विचार झाल्यास पुन्हा भोकर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार अशोक चव्हाण असतील. असे झाले तर श्रीजया चव्हाण यांचा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश होऊ शकतो? पण लोकसभेची माळ चव्हाणांच्या गळ्यात पडली तर मात्र श्रीजया भोकरमधून विधानसभा लढू शकतात.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT