Imtiaz Jalil News  Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad News : `आदर्श`च्या ठेवीदारांना इम्तियाज जलील पैसे मिळवून देणार का ?

सरकारनामा ब्युरो

Marathwada : आदर्श नागरी सहकरी पतसंस्थेत पाच हजार ठेवीदारांच्या दोनशे कोटीहून अधिकच्या ठेवी बुडाल्या. आयुष्यभराची कमाई गेली म्हणून एका ठेवीदाराने आत्महत्या केली, तर अनेकांना पुढे काय? ही चिंता सतावत आहे. (Aurangabad News) ठेवीदारांनी आदर्श संस्थेच्या कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केले त्या दिवसापासून खासदार इम्तिाज जलील यांनी या प्रकरणात लक्ष घातले. कुठेच दाद मिळत नसतांना इम्तियाज यांनी ठेवीदारांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि लोकांनी देखील त्यांच्यावर विश्वास दाखवला.

महिला, तरुण, विद्यार्थींनी, पुरूष अशा सगळ्यांनीच आपल्या व्यथा इम्तियाज (Imtiaz Jalil) यांच्यासमोर मांडल्या. एखादी घरातील व्यक्ती वाटावी अशा पद्धतीने ठेवीदार इम्तियाज यांच्यासमोर व्यक्त होत आहेत. ठेवीदारांना सोबत घेवून पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला, तेव्हापासून आदर्शचा अध्यक्ष अंबादास मानकापे पाटील याच्यासह इतर तीन संचालकांना पोलिसांनी अटक केली. (Aimim) त्यानंतरही मोर्चा काढून पोलिस आणि सरकारवर दबाव वाढवून ठेवीदारांचे पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न इम्तियाज जलील करतांना दिसत आहेत.

यासाठी एक कृती समिती स्थापन झाली असली तरी अध्यक्ष आणि तीन संचालकांना अटक यापुढे प्रकरण पुढे सरकत नाहीये. (Scam) विशेष म्हणजे विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशनात जिल्ह्यातील तीन मंत्री, एक विरोधी पक्षनेता आणि केंद्रातील दोन राज्यमंत्री यांनी आदर्श घोटाळ्याबद्दल शब्दही काढलेला नाही. विधीमंडळात किरीट सोमय्याच्या अश्लील व्हिडिओची चर्चा होते, त्यावर कारवाईची मागणी होते. पण ज्या सर्वसामान्यांच्या आयुष्यभराच्या ठेवी पतसंस्थेच्या भ्रष्ट अध्यक्ष आणि संचालकांमुळे धोक्यात आल्या, तो विषय देखील लोकप्रतिनिधी, मंत्री सभागृहात मांडत नाही हे दुर्दैवीच म्हणावे लागेल.

कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी विधानसभेत या संदर्भात प्रश्न उपस्थितीत करत ठेवीदारांना पैसे परत मिळवून देण्याची मागणी केली. ते वगळता इतर कोणीही अद्याप या घोटाळ्यावर सभागृहात बोलायला तयार नाहीत. हे सगळं आपल्याला अपेक्षित होतं, असा आरोप करत इम्तियाज यांनी या प्रकरणात आणखी आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसात राज्याचे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री या पैकी कोणीही विधीमंडळात नागरी सहकारी पतसंस्था, सहकारी बॅंकांमधील ठेवीदारांच्या पैशाची हमी सरकार घेत असल्याचे जाहीर करावे.

या संस्था, बॅंका राज्य सरकार, सहकार खात्या अंतर्गत काम करतात. त्यामुळे त्यांच्या कारभारावर सरकारचा अंकुश असतो. तेव्हा अशा बॅंका, संस्थांच्या अध्यक्षाने भ्रष्टाचार केला, तर ठेवीदारांच्या ठेवींची जबाबदारी ही सरकारवर येते. दोन दिवसांत सरकारने केवळ आदर्शच नाही तर राज्यातील सर्वच सहकारी बॅंका आणि पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या पैशाची हमी घ्यावी. अन्यथा येत्या सोमवारपासून सहकारी बॅंका आणि पतसंस्थांसमोर आपले पैसे काढून घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागलेल्या तुम्हाला दिसतील, असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला आहे. एकंदरित आदर्श पतसंस्थेतील घोटाळ्याच्या माध्यमातून इम्तियाज जलील सरकारची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहेत. आता त्यांचे हे प्रयत्न ठेवीदारांच्या त्यांचे पैसे परत मिळवून देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT