Shivsena UBT News : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा अवघ्या ५ हजार मतांनी पराभव झाला होता. (Sambhajinagar Loksabha News) अपक्ष हर्षवर्धन जाधव यांच्या उमेदवारीने खैरेंच्या हक्काच्या मतांमध्ये विभागणी झाल्याचा फायदा एमआयएमच्या इम्तियाज जलील यांना झाला होता. त्यामुळे खैरेंचा सलग लोकसभेतील पाचवा विजय हुकला. दरम्यान, राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या, विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा प्रयोग झाला.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री झाले, अडीच वर्षांनंतर पुन्हा शिवसेनेत भूकंप आला शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांसह पक्षात मोठी फूट पडली. महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. सध्या राज्यात फडणवीस शिंदे आणि पवार असे ट्रिपल इंजिनचे सरकार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि शिवसेना (Shivsena) राष्ट्रवादीतील फुटीर गटात आगामी लोकसभा निवडणुकीत टक्कर होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर उद्धव ठाकरे यांना पक्ष फुटीनंतर राज्यभरात मिळत असलेली सहानुभूती आणि त्याचा फायदा लोकसभेच्या उमेदवारांना व्हावा, यासाठी ठाकरे गटाकडून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या नेत्यांना संधी दिली जाणार असल्याचे बोलले जाते. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) या फाटाफुटीच्या काळातही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.
गेल्या लोकसभा निवडणुकीत खैरेंचा थोडक्यात झालेला पराभव उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे २०२४ मध्ये पुन्हा एकदा खैरेंना उमेदवारी दिली जाईल, असे निश्चित मानले जाते. परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर विधान परिषदेचे आमदार तथा संभाजीनगरचे शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. विरोधी पक्षात बसायची वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी अंबादास दानवे यांना पसंती दिली.
त्यानंतर गेल्या वर्षभरापासून दानवे यांनी विरोधी पक्षनेता म्हणून सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर राज्यात शिंदे आणि भाजपवर कडाडून हल्ला चढवला. शिंदे- फडणवीस सरकारच्या प्रत्येक हल्ल्याला दानवेंकडून जशास तसे शिवसेना स्टाइल प्रत्युत्तर दिले जात आहे. एकीकडे चंद्रकांत खैरे पक्षातील वरिष्ठ नेते तर दुसरीकडे अंबादास दानवे आपल्या आक्रमक शैलीमुळे उद्धव ठाकरेंच्या अधिक जवळ गेलेले.
अशावेळी आगामी लोकसभा निवडणूक पाहता छत्रपती संभाजीनगरातून उद्धव ठाकरे खैरेंच्या नावाला पसंती देतात? की मग दानवेंना दिल्लीचा मार्ग खुला करून देतात, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील राजकीय संघर्ष उघडपणे सुरू नसला तरी त्यांच्यातील मतभेद कायम असल्याचे वारंवार समोर आले आहे. खैरे यांनी नुकतेच एका वृत्तवाहिनीशी बोलताना संभाजीनगर जालना-स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंची पहिली पसंती अंबादास दानवे नव्हते, असे सांगत दानवे यांच्याबद्दल आपल्या मनात असलेला राग व्यक्त केला होता.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप- शिंदे गटाशी दोन हात करायचे असल्यामुळे आधी खैरे आणि दानवे यांच्यात समेट घडवून आणणे महत्त्वाचे आहे. वरिष्ठ पातळीवरून मात्र अशा प्रकारचे प्रयत्न होताना सध्या तरी दिसत नाहीत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या जवळपास वावरणाऱ्या नेत्यांमध्ये खैरे- दानवे सातत्याने दिसतात. ठाकरेंनी दोघांनाही मानाचे स्थान देण्याचे धोरण ठेवले आहे, परंतु लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरातून उमेदवारी देताना ठाकरे कोणाला झुकते माप देतात, यावर विजयाचे गणित अवलंबून असणार आहे.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.