Dharashiv News : राज्यात शिवसेना पक्ष फुटला, आमचे चिन्ह गेले, समोरून पन्नास खोक्यांची आॅफर होती, पण त्याला लाथ मारून आम्ही उद्धव साहेबांच्या पाठीशी कायम राहिलो. पक्षाशी असलेली निष्ठा ढळू दिली नाही, खोक्यांसाठी गद्दारी केली नाही. त्यामुळे तुम्हालाही कुठे तरी विचार करावा लागेल, की प्रामाणिक माणसाच्या पाठीशी उभे रहायचे की संधिसाधूंच्या?, असा सवाल महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी मतदारांना केला.
लोकसभेच्या धाराशिव (Dharashiv Lok Sabha) मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. रविवारी सायंकाळी निवडणूक प्रचार थांबणार आहे. तत्पुर्वी विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी विरोधकांवर हल्ला चढवतांना ते संधीसाधू असल्याचा आरोप केला. सात तारखेला मतदान करण्यापुर्वी तुम्हाला एका गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. प्रामाणिकपणाला मत द्यायचे की संधीसाधूला? कारण ही निवडणूक लोकशाही वाचवण्यासाठीची लढाई आहे.
शिवसेना फुटली, गद्दारांनी उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खूपसला आणि पन्नास खोक्यासाठी स्वाभिमान गहाण ठेवला. पण पक्ष फुटला, निवडणूक चिन्ह गेले, तरी आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी प्रामाणिक राहिलो, एकनिष्ठ राहिलो. समोरून आमच्याकडे या पन्नास खोके देतो, असे आमिष दाखवले जात होते, पण त्या पन्नास खोक्यावर लाथ मारली आणि पक्षासोबतची निष्ठा कायम ठेवली. तेव्हा मतदान करतांना प्रामाणिकपणा की संधीसाधूपणा याचा विचार नक्की करा, असे आवाहन ओमराजे यांनी केले.
आम्ही योद्धा आहोत, संकटात डगमगलो नाही, विरोधकांशी लढा देत राहिलो. योद्धा कायम सज्ज असतो, मग ते युद्ध असो की निवडणूक, असेही ओमराजे यांनी ठणकावून सांगितले. गेल्या पाच वर्षात खासदार म्हणून सामान्य जनतेमध्ये विश्वास निर्माण करू शकलो यालाच मी साध्य मानतो. ही सामान्य जनताच माझी ताकद आहे. माणूस जीवनात चुकत असतो आणि पुढे जाऊन चूक सुधारत असतो. पण ज्यांचा पायाच धोका देऊन तयार झाला आहे ते कायम धोकेबाजच असतात.
ते भावाला धोका देतात, ते 40 वर्षे जनतेला धोका देतात, ते तिकिटासाठी पक्ष निष्ठेला धोका देतात. त्यांना अनेक वर्षे त्यांच्या धन संपत्तीवर भरोसा असतो की ते या बळावर काहीही करू शकतात. आपल्या धाराशिवची जनता ही साधी जरी असली तरी स्वाभिमानी आहे. त्यामुळे वेळोवेळी झालेल्या धोक्यातून आता सावध झाली आहे. चूक झाली तर माफ करणारे धाराशिवचे नागरिक धोक्याला कधीच माफ करत नाहीत हे नक्की, अशा शब्दात ओमराजे यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.
जनतेला कायम धोका देऊन यांचा झाला विकास आणि जिल्हा ठेवला भकास. यात दुसरा कोणी तळमळीने काम करत असेल तर यांची मळमळ होते. यावेळी यांनी एकच लक्षात ठेवावे चुकीला माफी आहे पण धोक्याला नाही, असा इशारा ओमराजे यांनी नाव न घेता महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील आणि राणाजगजीतसिंह पाटील यांना दिला.
(Edited By : Sachin Waghmare)