Builder Shot Dead in Nanded Case
Builder Shot Dead in Nanded Case Sarkarnama
मराठवाडा

Nanded : संजय बियाणींच्या संपत्तीत माझी चार वर्षाची मुलगी वारसदार असल्याचा महिलेचा दावा..

सरकारनामा ब्युरो

नांदेड : बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येसंदर्भात गेल्या दोन महिन्यांपासून पोलिस तपास करत असून आत्तापर्यंत १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. (Nanded) त्याचबरोबर दुसरीकडे नांदेडच्या दिवाणी न्यायालयात एका महिलेने शुक्रवारी (ता. १७) दाद मागितली असून तिची चार वर्षाची मुलगी संपत्तीत वारसदार असल्याचा अर्ज सादर केला आहे.

बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या कुटुंबातही कलह निर्माण झाला असून यापूर्वी त्यांच्या पत्नी अनिता बियाणी यांच्या तक्रारीवरून दीर प्रविण बियाणी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता. (Murder Case) दरम्यान, अनिता बियाणी यांनी संपत्तीची वारसदार म्हणून न्यायालयात दावा दाखल केला होता. (Marathwada) त्या दाव्यावर आता एका महिलेने आक्षेप घेतला असून तसा अर्ज शुक्रवारी सादर केला आहे.

या महिलेला चार वर्षाची मुलगी असून ती बियाणी यांच्या संपत्तीची वारसदार असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. सदर महिलेच्या वकीलांनी कागदपत्रे जमा करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला आहे. या प्रकरणाची सुनावणी आता २४ जून रोजी ठेवण्यात आली आहे. संजय बियाणी यांची पाच एप्रिल रोजी त्यांच्या राहत्या घरासमोर दोन जणांनी दुचाकीवर येऊन गोळ्या घालून हत्या केली होती.

या प्रकरणाचा तपास एसआयटी करत असून पोलिसांनी आत्तापर्यंत बारा आरोपींना अटक केली आहे. सध्या हे सर्व आरोपी पोलिस कोठडीत आहेत. एकीकडे या प्रकरणाचा तपास सुरू असताना दुसरीकडे बियाणी कुटुंबियातही वाद सुरू झाले आहेत. त्यामध्ये अनिता बियाणी यांनी दीर प्रविण बियाणी यांनी फायनान्सच्या कार्यालयातून व्यवहाराची हार्ड डिस्क चोरून नेल्याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरून गुन्‍हा दाखल झाला होता.

त्यानंतर प्रविण बियाणी यांना तीन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली होती. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. कुटुंबात संपतीवरून वाद, आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे सुरू असतांना आता यात आणखी एका महिलेची भर पडली आहे. सदर महिलेने तिची चार वर्षाची मुलगी संपत्तीत वारसदार असल्याचा दावा करत तसा अर्जच थेट न्यायालयात केला आहे. बियाणी हत्या प्रकरणात अनेक खळबळजनक गोष्टी समोर येत असल्याने तपास यंत्रणाही चक्रावल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT