Ajit Pawar ON Chief Minister Ladki Bahin Yojana Sarkarnama
मराठवाडा

Ladki Bahin Yojana : ऐन दिवाळीत लाडक्या बहिणींना 3 हजार मिळणार; अजितदादांचा वादा, नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar On Mukhyamantri Ladki Bahin Yojana : "माता माऊलींसाठी आम्ही लाडकी बहीण योजना आणली आहे. तुम्ही तुमच्या हक्काचे पैसे कधीही काढू शकता. आम्ही दिलेल्या योजना पाच वर्षे चालू राहण्यासाठी तुम्हाला घड्याळा चिन्हाला मतदान करावे लागेल. मी बोलतो तसा वागतो, हा अजितदादांचा वादा आहे."

Jagdish Patil

Beed News, 01 Oct : "लाडक्या बहि‍णींना भाऊबीज म्हणून तीन हजार रुपये देणार आहे, हा अजितदादांचा वादा आहे." असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील लाडक्या बहि‍णींशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

त्यामुळे आता पुन्हा एकदा बहि‍णींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार का? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सत्ताधारी आणि विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या जात आहेत.

महायुतीतील (Mahayuti) नेते आपल्या सभांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार करत आहेत. अशातच आज बीडमधील सभेत अजित पवार यांनी आचारसंहिता लागण्यापूर्वी लाडक्या बहि‍णींना भाऊबीज म्हणून तीन हजार रुपये देणार आहे, हा अजितदादांचा वादा आहे, असं मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे जर हे तीन हजार बहि‍णींना सरकारने दिले तर त्यांची दिवाळी आणखी गोड होणार यात शंका नाही.

माजलगाव येथील सभेत बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, "लाडकी बहीण योजनेवरून विरोधक टीका करतात, पण आमच्या अंगाला काही भोकं पडत नाहीत. ते सत्तेत असताना कोणती योजना आणली? मात्र, माता माऊलींसाठी आम्ही लाडकी बहीण योजना आणली आहे. तुम्ही तुमच्या हक्काचे पैसे कधीही काढू शकता.

आम्ही दिलेल्या योजना पाच वर्षे चालू राहण्यासाठी तुम्हाला घड्याळा चिन्हाला मतदान करावे लागेल. मी बोलतो तसा वागतो, हा अजितदादांचा वादा आहे. रक्षाबंधनला जसे तीन हजार रुपये दिले तसेच भाऊबीजेला माझ्या बहिणीला मी खाली हाताने पाठवणार नाही तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार हा माझा वादा आहे."

दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तीन हफ्ते महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. राज्य सरकारने ऐन रक्षाबंधन सणाच्या आधी महिलांच्या बँक खात्यात या योजनेच्या दोन हफ्त्यांचे 3000 रुपये जमा केला होते. त्यानंतर, सप्टेंबर महिन्याचे पैसे 29 सप्टेंबर रोजी जमा करण्यात आला आहे. तर आता दिवाळीला देखील महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा होणार असल्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT