ZP Member Allowance: राज्यात सध्या विधान परिषदेच्या सतरा पैकी अकरा जागांसाठी निवडणूक प्रचार, सवांद बैठकांना जोर आला आहे. काही जिल्ह्यातील मतदार नगरसेवक, सदस्य हे सहलीवर गेले आहेत. तर काहींना कोणी सहलीवर पाठवत नाही, अशी अवस्था आहे. नगरसेवकांना टोकन दिले, फाईव्ह स्टार हाॅटेलमध्ये ठेवले, त्यांची सगळी बडदास्त ठेवली जात आहे, अशा चर्चांना उधाण आलेले असताना लातूर-बीड-धाराशीव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या एका संवाद बैठकीत झेडपी सदस्याने उपस्थितीत उमेदवार, व्यासपीठावरील मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी यांची चांगलीच कोंडी केली.
आमदार, खासदारांना मिळणाऱ्या मानधनाचा उल्लेख करत या पठ्ठ्याने थेट जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांचे मानधन वाढवण्याची मागणी करत खळबळ उडवून दिली. विधान परिषदेवर जाण्यासाठी महायुती-महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये सध्या स्पर्धा आहे. लातूर-बीड-धाराशीवची जागा भाजपाकडे असून यावेळी त्यांनी माजी मंत्री बसवराज पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीने काँग्रेसच्या महेश देशमुख यांना उमेदवारी दिली आहे.
काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेल्या बसवराज पाटील यांचे पुनर्वसन भाजपाने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन केले आहे. त्यांच्या प्रचारासाठी महायुतीचे तीनही जिल्ह्यातील नेते सध्या संवाद बैठका घेत आहेत. अशाच एका संवाद बैठकीत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, उमेदवार बसवराज पाटील, शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्यासमोरच एका झेडपी सदस्याने मानधन वाढीचा मुद्दा उपस्थित केला.
जिल्हा परिषद सदस्याला तीन हजार तर पंचायत समिती सदस्याला फक्त दीड हजार रुपये मानधन दिले जाते. आमदारांना किती मानधन आहे? असा थेट सवाल या सदस्याने केला, तेव्हा उपस्थित सदस्यांना त्याचा निर्भीड बाणा आणि थेट सहकार मंत्र्यासमोरच मानधनासारखा जिव्हाळ्याचा विषय मांडल्याबद्दल कौतुक वाटले. आमदारांना लाख-दीड लाख मानधन, वाहतुक भत्ते मिळतात, मग झेडपी-पंचायत समिती सदस्यांना किमान दहा हजार रुपये मानधन तरी द्या, वाहन भत्ता द्या, अशी मागणी केली.
बसवराज पाटील यांना उद्देशून तुम्ही देखील जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले आहे, मग सांगा जिल्हा परिषद सदस्याला मिळणारे मानधन योग्य आहे का? आमदारांना लाखाच्या वर मानधन, वाहन भत्ता व इतर सुविधा दिल्या जातात, मग आम्हाला किमान दहा हजार रुपये मानधन आणि वाहनभत्ता तरी द्या, अशी मागणी या सदस्याने संवाद बैठकीत केली. या सगळ्याकडे महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील स्मितहास्य करत पाहत होते, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे हे या अचानक झालेल्या डिमांडमुळे अ्वाक झाले, तर शिक्षक आमदार या सदस्यासकडे पाहतच राहिले.
शेवटी पुढे सरसावत त्यांनी या सदस्याच्या हातातून माईक हिसकावून घेतला, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे व्यासपीठावरून उठून चालू लागले आणि संवाद बैठकीतील वातावरणच बदलले. अखेर आमदार विक्रम काळे यांनी त्यांना 'शक्य असेल तर द्या', असे म्हणत वेळ मारून नेली. नगरसेवक, सदस्यांना सहलीवर घेऊन जाणे, पंचतारांकित हाॅटेलमध्ये त्यांचा पाहुणचार करणे या पेक्षा झेडपी सदस्याने मानधन वाढीची मागणी करत सगळ्यांचीच सहानुभूती मिळवली. पण व्यासपीठावरील मंत्री आणि लोकप्रतिनिधींची मात्र यामुळे चांगलीच कोंडी झाल्याचे दिसून आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.