St workers Strike
St workers Strike Sarkarnama
महाराष्ट्र

मेस्माची टांगती तलवार, डोळ्यात अश्रू : पण कर्मचारी संपावर ठाम

सरकारनामा ब्युरो

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी सरकार हरतऱ्हेने प्रयत्न करत आहे. आधी निलंबन, पगार कटिंग, मग सेवासमाप्ती यानंतर आता राज्य सरकारने काल एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा कायदा लावण्याचा इशारा दिला आहे. काल पर्यंत एसटी कर्मचारी अत्यावश्यक सेवेमध्ये येत नसल्यामुळे त्यांना मेस्मा लागू होत नाही असा दावा केला जात होता. मात्र परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी अत्यावश्यक सेवेमध्ये येते आणि त्यांना मेस्मा (Mesma-act) लागू होतो असे स्पष्ट केल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. पण या सगळ्यानंतरही कर्मचारी संपावर ठाम आहेत.

काल आझाद मैदान येथील एसटी कर्मचारी राजेंद्र कांबळे यांचा बीपी लो झाला आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. राज्य सरकारने मेस्मा कायद्याचा इशारा दिल्यानंतरच त्यांच्यामध्ये भीती निर्माण होवून त्यांना त्रास सुरु झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे यावेळी अनेक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू पहायला मिळाले. मात्र या सगळ्यानंतरही जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याची भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

कर्मचाऱ्यांना मेस्मा लागू होत नाही : सदावर्तेंची भूमिका.

अनिल परब यांनी मेस्माचा इशारा दिल्यानंतर विलिनीकरण होत नाही तोपर्यंत मेस्मा लागत नाही असे सांगत गुणरत्न सदावर्ते यांनी परब यांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच सदावर्ते यांनी अनिल परब यांच्या कायद्याच्या अभ्यासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

ते म्हणाले, माणसं डिग्री घेतात मात्र कायद्याचा त्यांनी किती अभ्यास केला हा मोठा प्रश्न आहे. मेस्माचा माझा अभ्यास आहे, आणि जो पर्यंत राज्य शासनात विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांना मेस्मा लागत नाही. यातून सरकार एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण तयार करत असल्याचा आरोपही सदावर्ते यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT