Imtiaz Jaleel  Sarkarnama
महाराष्ट्र

Imtiaz Jaleel : 'स्थानिक'मध्ये 'पतंग' उडाला नाही, तर एमआयएम अनेक पदाधिकाऱ्यांचे दोर कापणार!

MIM Local Body Elections:लोक आमच्या पक्षाकडे आशेने पाहत आहेत, केवळ मुस्लिमच नाही तर इतर समाजाचे अनेक जण आमच्यासोबत जोडले गेले आहेत. पुसदमध्ये आम्ही मराठा, लंबाड, आदिवासी समाजाला निवडणुकीत संधी दिली आहे.

Jagdish Pansare

AIMIM In Local Body Election : 'एमआयएम' पक्षाची ताकद महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत आहे. रॅली, प्रचार सभा, बैठकांना मिळणारा प्रतिसाद आम्हाला बळ देणार आहे. या जोरावरच आम्ही महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये 22 नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि तीनशेवर नगरसेवक पदासाठीचे उमेदवार दिले आहेत. निवडणुकीच्या तयारी आधीच मी राज्यातील संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करून टाकली.

अनेकांना हा निर्णय पटला नाही, पण त्यामागे कार्यकर्त्यांना झोकून देऊन कामाला लावणे हाच माझा उद्देश होता. आता ज्या भागात नगराध्यक्ष, नगरसेवक निवडून येतील त्या सगळ्यांच्या साक्षीने त्या त्या भागातील पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देणार असल्याचे, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी 'सरकारनामा'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत एमआयएमचा पतंग उडाला नाही, तर मात्र अनेक पदाधिकाऱ्यांचे दोर कापून, त्यांना घरी बसवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

आमच्या पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हे विदेशात गेल्यामुळे महाराष्ट्रातील प्रचाराची धुरा माझ्या खांद्यावर होती. हैदराबादहून आमच्या पक्षाचे तीन आमदारही मदतीला आले होते. राज्याच्या विविध भागात सभा, कॉर्नर बैठका, पदयात्रा केल्या. लोकांचा प्रचंड प्रतिसाद प्रत्येक ठिकाणी मिळाला. लोक आमच्या पक्षाकडे आशेने पाहत आहेत, केवळ मुस्लिमच नाही तर इतर समाजाचे अनेक जण आमच्यासोबत जोडले गेले आहेत. पुसदमध्ये आम्ही मराठा, लंबाड, आदिवासी समाजाला निवडणुकीत संधी दिली आहे.

सत्ताधारी महायुतीतील पक्षांकडून निवडणुकीत अक्षरश: पैशाचा महापूर आणला गेला. हजार-पाचशे रुपये घेऊन काही वर्षापुर्वी लोक मतदान द्यायचे, आता हा आकडा पंचवीस हजारांच्यावर गेला आहे. याचे आश्चर्य वाटत नाही, याचे कारण सत्ताधारी पक्षांनी हा नवा ट्रेंड राजकारणा आणला आहे. निवडून येण्यासाठी पाण्यासारखा पैसा होता, नंतर खोऱ्याने पाच वर्ष पैसा ओढा हा पायंडा फडणवीस-शिंदे सरकारने सुरू केला आहे. अशा वातावरणातही आम्ही लढतो आहे. निश्चित स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आमचे काही नगराध्यक्ष आणि चांगल्या संख्येने नगरसेवक निवडून येतील, असा विश्वास इम्तियाज यांनी व्यक्त केला.

निकालानंतर मिशन महापालिका

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच एमआयएम महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागणार आहे. मावळत्या महापालिकेत आम्ही विरोधी पक्षाची भूमिका बजावली होती. आता सत्ताधारी म्हणून बसण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आमची ताकद आणि नगरसेवकांची संख्या यावेळी वाढलेली दिसेल. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका आम्ही स्वबळावर लढलो, तशा महापालिकाही लढू. सध्या तरी कोणत्याही पक्षाशी युती संदर्भात बोलणी किंवा हालचाली सुरू नाहीत. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतरची परिस्थिती पाहून पोस्ट अलायन्सचा विचार करू, असेही इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले.

बिहारच्या निकालावर समाधानी नाही..

बिहार विधासभा निवडणुकीत एमआयएमने 25 जागा लढवल्या होत्या, पैकी आम्ही पाच जिंकल्या. गेल्यावेळीचे चार मतदारसंघ राखताना त्यात नव्या एका मतदारसंघात एमआयएमला विजय मिळाला. गेल्यावेळचे संख्याबळ राखले असले तरी या कामगिरीवर आम्ही समाधानी नाही. यावेळी आम्हाला 9 जागांची अपेक्षा होती.

काँग्रेसही बी टीम आहे का?

बिहार विधानसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेसकडे सहा जागा मागितल्या होत्या. आमचे पाच आमदार होतेच, फक्त एक जागा आम्ही वाढवून मागत होतो. परंतु काँग्रेसच्या नेत्यांनी ती दिली नाही. काँग्रेसने आमच्याशी युती केली असती तर बिहारमध्ये त्यांचे किमान तीस-पस्तीस आमदार निवडून आले असते. देशात सर्वाधिक काळ सत्ता भोगलेल्या राष्ट्रीय पक्षाला बिहारमध्ये फक्त सहा जागा निवडून आणता आल्या. त्या तुलनेत एमआयएमची कामगिरी किती तरी पटीने चांगली म्हणावी लागेल. काँग्रेसची भूमिका बघता कधी कधी, ती भाजपची बी टीम तर नाही ना? अशी शंका येते, असा टोला इम्तियाज जलील यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT