Aditi Tatkare Sarkarnama
महाराष्ट्र

Aditi Tatkare : 'लाडकी बहीण' योजनेतून सेवा शुल्कला कात्री; मंत्री तटकरेंची बँकांना 'वॉर्निंग'

Minister Aditi Tatkare reviewed CM Ladki bahin yojana : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयात राज्यस्तरीय आढावा बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आढावा घेतला.

Pradeep Pendhare

Mumbai News : राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात जमा होताच, त्यातून बँक सेवा शुल्क कपात करून घेत आहेत. यातून महिलांमध्ये रोष वाढत आहे. याची दखल महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतली.

'महिलांच्या बँक खात्यातील लाभाची रक्कम कपात करून घेतल्यास आणि त्याची तक्रार प्राप्त झाल्यास बँकावर कारवाई करण्यात येईल', असा इशारा मंत्री आदिती तटकरे यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल आज मंत्रालयात राज्यस्तरीय आढावा बैठक दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे घेण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या तथा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, एकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त कैलास पगारे या बैठकीला उपस्थित होते.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ दरमहा पात्र महिलांना देण्यात येत आहे. या लाभातून काही बँकांकडून मिनिमम बॅलन्स, ईसीएस मँडेट रिटर्न, चेक रिटर्न यासारखे शुल्क आकारून महिलांच्या बँक खात्यातील लाभाची रक्कम कपात करून घेतली जात आहे. अशा बँकांवर कारवाई करण्यात येईल".

'काही पात्र महिलांच्या बँक (BANK) खात्याला आधार सिडींग नसल्याने लाभ मिळत नाही. याबाबत अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मदतीने 2 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबवावी. बँकेशी संबंधित अडचणी संदर्भात स्थानिक पातळीवर बैठका घ्याव्यात', अशा सूचनाही मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.

पुरूषांच्या खात्यावर पैसे...

नांदेड जिल्ह्यात प्रत्यक्षात अर्ज भरताना लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले आणि पुरुषांचे आधार क्रमांक, अकाउंट नंबर दिले गेलेच, त्यामुळे पुरुषांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करून ज्या केंद्रांवर हे अर्ज भरले गेले, त्या केंद्र चालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही मंत्री तटकरे यांनी दिलेत.

1 कोटी 87 लाख पात्र लाभार्थी

'आतापर्यंत 2 कोटी 40 लाख महिलांची नोंदणी झाली असून 1 कोटी 87 लाख पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. उर्वरित अर्जांची पडताळणी तातडीने करून घ्यावी', अशा सूचनाही मंत्री तटकरे यांनी यावेळी दिल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT