Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Cabinet expansion: मंत्रिपद भुजबळ की धनंजय मुंडेंना ? अजितदादांनी शेवटच्या क्षणी फोन करीत सस्पेन्स संपवला

NCP Political News : निकाल लागल्यानंतर गेल्या 22 दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. रविवारी मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला असून शपथविधी सोहळा पार पडणार आहे. महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी पुढे आली आहे.

Sachin Waghmare

Nagpur News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. त्यानंतर 5 डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. निकाल लागल्यानंतर गेल्या 22 दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. रविवारी मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला असून शपथविधी सोहळा पार पडणार आहे. महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी पुढे आली आहे. (Maharashtra Cabinet expansion News)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्याच्या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाकरी फिरवली असून जुन्या पाच चेहऱ्यांना वगळत त्यांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत मंत्रिपद छगन भुजबळ की धनंजय मुंडे यांना दिले जाणार यावर एकमत होत नव्हते. शपथविधीला काही मिनिटे शिल्लक असतानाच अजितदादांनी धनंजय मुंडे यांना फोन करीत त्यावरचा सस्पेंस संपवला.

राष्ट्र्वादी काँग्रेसच्या (NCP) संभाव्य मंत्र्यांच्या यादीमध्ये अजित पवार यांनी धर्मरावबाबा आत्राम, दिलीप वळसे पाटील, अनिल पाटील, संजय बनसोडे यांचा पत्ता कट केल्याचे पुढे आले होते. दुसरीकडे छगन भुजबळ किंवा धनंजय मुंडे यांच्यापैकी एकाला संधी देण्यात येणार असल्याचे समजले. सुरूवातीच्या यादीत धनंजय मुंडे यांच्या नावाचा समावेश नव्हता. यामुळे विविध चर्चा रंगताना दिसल्या. धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्या नावाचा समावेश मंत्रिमंडळाच्या संभाव्य यादीत नव्हता.

शेवटच्या क्षणी अजितदादांनी या यादीत धनंजय मुंडे यांच्या नावाचा समावेश केला. त्यांना फोन करून मंत्री पदाची शपथ घेण्याचा निरोप देण्यात आला आहे. दुसरीकडे ऐनवेळी ज्येष्ठ मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांचे नाव वगळण्यात आल्याचे समजते. त्यामुळे नाराज असलेल्या भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा नागपूरमध्ये होत असलेल्या मेळाव्याला दांडी मारत नाराज असल्याचे स्पष्ट केले.

धनंजय मुंडे यांनी परळीतून विधानसभेची निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे अत्यंत मोठ्या मतांनी त्यांचा विजय झाला होता. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची संभाव्य मंत्रिमंडळाची यादी आली असून त्यामध्ये आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तमामा भरणे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, माणिकराव कोकाटे, धनंजय मुंडे, इंद्रनील नाईक यांच्या नावाचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT