Amol Mitkari on NCP politics : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. दिल्लीपासून ते कन्याकुमारीपर्यंत त्यावर राजकीय प्रतिक्रिया येत आहे. सत्ताधारी भाजप महायुतीकडून देखील ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर सावध प्रतिक्रिया देत आहेत.
यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या एकत्र येण्यावर आमदार अमोल मिटकरी यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. आमदार मिटकरी यांच्या या सूचक विधानात मुहूर्त असल्याने पवार-सुळे बहिणीभावाच्या एकत्र येण्याच्या चर्चांना आता जोर धरला आहे.
आमदार अमोल मिटकरी म्हणाले, पांडुरंगाची ईच्छा असली तर बहिण-भाऊ आषाढी एकादशीपर्यंतही एकत्र येऊ शकतात. 10 तारखेला पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाट बघा. मेळाव्यात मोठे संकेत मिळतील. पांडूरंगाची इच्छा असली, तर आषाढीपर्यंत दोन्ही राष्ट्रवादी (NCP) एकत्र येईल, असे भाकीत देखील मिटकरी यांनी व्यक्त केलं.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मध्यतंरी चर्चांना जोर धरला होता. यातच शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार घरगुती अन् राजकीय वेगवेगळ्या कार्यक्रमांत एकत्र येत होते. समोरासमोर येत होते. काही ठिकाणी संवाद देखील होत होता. त्यामुळे दोन्ही पवार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यात राजकीय विचार जरी वेगळे असले, तरी पवार कुटुंब एकत्र आहे, असे म्हटले होते. यानंतर शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर माहिती नाही, अशी प्रतिक्रिया देत, पूर्णविराम दिला होता.
मात्र दोन्ही राष्ट्रवादीकडील प्रमुख नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना देखील दोन्ही पवार एकत्र येण्याबाबत विरोध नाही. पवारसाहेब ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक आहेत. अजित पवार आणि पवारसाहेब जो आदेश देतील, तो आमच्यासाठी सर्वोच्च असणार, अशीच प्रतिक्रिया दोन्ही राष्ट्रवादीकडील नेत्यांची आजही आहे.
यातच आमदार अमोल मिटकरी यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून प्रतिक्रिया देत, खळबळ उडवून दिली. 'आज भागवत एकादशी आहे. त्यानिमित्ताने बोलतो आहे. पांडुरंगाच्या मनात असलं, तर आषाढी एकादशीचा मुहूर्तचं कशाला? कुठलाही मुहूर्त असू शकतो', असेही मिटकरी यांनी म्हटले.
ठाकरे बंधूंनी एकत्र यावं हा त्यांचा, आणि त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. जर दोघे भाऊ एकत्र येत असतील, तर तर त्यांच्या निर्णयाला आमच्या शुभेच्छा आहे. कुणालाही कमजोर समजू नये. दोघे भाऊ एकत्र आल्यास निश्चितच मराठी माणसाची ताकद वाढेल. निश्चितच एकत्र आल्यावर राजकीय समीकरणे बदलून त्याचा परिणाम जाणवेल, असेही आमदार मिटकरी यांनी म्हटले. दोघे भाऊ एकत्र येत असल्यास त्यांच्या, आणि मराठी माणसाच्या मुंबईच्या दृष्टीने राजकीय समीकरणांवर परिणाम होऊ शकतो. मात्र, त्यांच्या एकत्र येण्याने महायुतीवर काही परिणाम होईल, असं वाटत नाही. कारण, महायुती म्हणून आम्ही भक्कम आहोत, असही मिटकरी यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.