rohit pawar rajendra raut.jpg sarkarnama
महाराष्ट्र

Rohit Pawar : आमदार राजेंद्र राऊतांनी केलेली एकेरी टीका जिव्हारी; रोहित पवारांनी A टू Z सगळंच काढलं

Rohit Pawar Vs Rajendra Raut : रोहित पवार यांनी बार्शीत जाऊन आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आमदार राऊत आणि रोहित पवार आमने-सामने आले आहेत.

Akshay Sabale

बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) आमदार रोहित पवार यांच्यात जोरदार तू-तू मैं-मैं सुरू आहे. राजेंद्र राऊत यांनी रविवारी ( 11 ऑगस्ट ) रोहित पवार यांच्या संपत्तीचा उल्लेख करत एकेरी शब्दांत टीका केली होती. याला रोहित पवार यांनीही जशास-तसं प्रत्युत्तर दिलं आहे.

"माझा कोणता व्यवसाय कुठे आहे, हे तुम्ही काढणार कोण?" असा थेट सवाल रोहित पवार यांनी आमदार राऊत यांना उपस्थित केला आहे. "तुम्हाला माझ्या संपत्तीची अधिकची माहिती पाहिजे, तर भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी संपर्क साधा," असं आव्हान सुद्धा रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी आमदार राऊत यांना दिलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

रोहित पवार म्हणाले, "माझा कुठला व्यवसाय कुठे आहे, हे तुम्ही काढणारे कोण? भाजपनं माझ्याबाबतची जबाबदारी ईडीवर सोपवली आहे. त्याबद्दल ईडी लक्ष देईल. मी माझी संपत्ती कुठेही लपवून ठेवली नाही. कष्टानं संपत्ती उभी केली, हे मला माहिती."

"बार्शी शहराच्या बाजूनं 400 एकर जमीन कुणाची आहे? कंत्राटं कुणी घेतली आहेत? भ्रष्टाचार कुणी केला? कुणाचा खडी, वाळू व्यवसायात पहिला भाव निघतो? व्यापाऱ्यांना मागे का बसावं लागतं? हे सगळं सामान्य लोक मला सांगतात. बार्शीत दहशतीचं वातावरण आहे. आमदार राऊतांविरोधात भूमिका घेतल्यानं अनेक मुलांविरोधात खोट्या कारवाया करण्यात आल्या. जनतेला सगळं माहिती आहे. उद्या माझ्याविरोधात काहीही बोललं, तरी माझ्याकडे पुरावे आहेत," असं रोहित पवार यांनी म्हटलं.

"राहिला प्रश्न माझ्या संपत्तीचा, तर ईडी माझ्यावर लक्ष ठेवून आहे. तुम्हाला माझ्या संपत्तीची अधिक माहिती पाहिजे, तर भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी संपर्क साधा. ईडीकडून सगळी कागदपत्रे घ्या. जगाला दाखवायचं ते दाखवा. मी घाबरत नाही. कारण, आम्ही खरी मराठी माणसं आहोत. न झुकणारी माणसं आहोत. स्वाभिमानाला, विचारांना टिकवणारी आणि जपणारी माणसं आहोत," असा शब्दांत रोहित पवार यांनी आमदार राऊत ( Rajendra Raut ) यांना ठणकावून सांगितलं आहे.

राजेंद्र राऊत काय म्हणाले होते?

आमदार राऊत यांनी म्हटलं, "रोहित पवार आणि त्यांच्या परिवाराने किती जमिनी हडप केल्या. कुठल्या बँकांना टोप्या घातल्या. तुमचे कारखाने कसे उभे राहिले, हे सर्वांना माहिती आहे आणि या राजा राऊतलाच जास्तच माहिती आहे. फक्त बारामतीचा विकास म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा विकास नाही. बारामतीचा विकास करा. पण इतर तालुके दुष्काळी कोणी ठेवले, हे रोहित पवारांनी आपल्या आजोबांना विचारलं असतं तर बरं झालं असतं."

"रोहित पवारांनी जमिनीचा, व्यापाऱ्याचा आणि माझ्या भावाच्या व्यवसायाचा विषय काढला. व्यवसाय करणं हा काही गुन्हा नाही. आम्ही प्रमाणिकपणे व्यवसाय करत आहोत. आम्ही कोणाची एक रुपयाची लबाडी केलेली नाही. कुठलाही चुकीचा व्यवसाय आम्ही केलेला नाही. कुठलाही उद्योगधंदा न करता रोहित पवार तुमच्या संपत्त्या कशा वाढल्या आहेत, याचे उत्तर अगोदर द्या. संपूर्ण महाराष्ट्राला लुटणारे तुम्ही आमच्या नावाने ओरडता. बार्शीतील गुंडगिरी कोणाची होती आणि कोणी मोडीत काढली. हे संपूर्ण बार्शीकरांना माहिती आहे. आम्ही गुंडगिरी करण्याचा प्रश्नच नाही आणि कुठलीही गुंडगिरी आम्ही होऊ दिली नाही. तुम्ही ज्यांच्या सभेला आला होता, त्यांनाही किती कंत्राटाची कामं घेतली आहे, हे विचारलं असतं बरं झालं असतं," असा हल्लाबोल आमदार राऊत यांनी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT