Mumbai News : महाराष्ट्रात आणखी एका काका-पुतण्याचा संघर्ष उफाळला आहे. माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि त्यांचा पुतणे अनिकेत कदम यांच्यात वाद उफळलाय. या वादात आता रामदास कदम यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांनी उडी घेतलीय.
"अनिकेत व्यावसायिक आहे, त्यांनं त्याचा व्यवसाय पाहावा, राजकारणाचे उद्योग करू नये, असा सल्ला देत आमच्या कुटुंबात विरोधकांकडून वाद लावून दिला जातोय", असा आरोप आमदार योगेश कदम यांनी केला.
दापोली विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) संजय कदम आणि एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदमांचे पुत्र आमदार योगेश कदम यांच्यात लढतीचे संकेत आहेत. यातच रामदास कदम यांचा पुतणे अनिकेत कदम यांनी ठाकरे गटाचे उमेदवार संजय कदम यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे दापोली विधानसभा मतदारसंघात कदमांच्या घरांमध्ये वाद उफाळून बाहेर येताना दिसतो. अनिकेत कदम यांनी थेट रामदास कदम यांच्याविरोधात शड्डू ठोकत शिवसेना ठाकरे पक्षातील उमेदवाराला पाठिंबा दिल्याने वाद वाढताना दिसत आहे. यावरून अनिकेतचे चुलत बंधू आमदार योगेश कदम देखील चांगलेच भडकलेत.
शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार योगेश कदम म्हणाले, "आमच्या कुटुंबात वाद लावून दिला जातोय. हे विरोधकांचे षडयंत्र आहे. विरोधक स्वतःचा स्वार्थ साधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधकांनी तालुक्यामध्ये, सगळ्या वाड्यांमध्ये भांडण लावून देण्याचे काम सुरू केले आहे. गटा-गटामध्ये भांडण लावून एक गट आपल्या बाजूने केले जात आहेत". अडीच वर्षापूर्वी आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न झाला. निवडणुका येतात आणि जातात, पण रक्ताचे नाते कायम राहते. त्यामुळे आमचे कुटुंब एकत्र यावे, यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे योगेश कदम म्हणाले.
अनिकेत कदम यांच्या भूमिकेबाबत देखील योगेश कदम यांनी भाष्य केले. "अनिकेत हा व्यावसायिक आहे. माझा चुलत भाऊ आहे. आमचे रक्ताचे नाते आहे. त्याने कोणाचा प्रचार करावा हा त्याचा वैयक्तिक प्रश्न. पण तो व्यावसायिक आहे. त्याने व्यवसाय पाहावा. त्याने राजकारणात येऊ नये, असे मला वाटते. तरी त्याची इच्छा असेल, तर त्याचे स्वागत करतो. त्याच्या राजकीय भूमिकेचे स्वागत करतो. परंतु त्याच्या या राजकीय भूमिकेचा आमच्या नात्यावर काहीच परिणाम होणार नाही, याची देखील काळजी आम्हाला घ्यावी लागणार आहे", असे योगेश कदम यांनी म्हटले.
दापोली विधानसभा मतदारसंघात आमदार योगेश कदम यांच्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय कदम निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे संकेत आहेत. त्यानुसार संजय कदम यांनी राजकीय गणिते जुळवण्यावर भर दिला आहे. आमदार योगेश कदम यांचे चुलत बंधू अनिकेत कदम यांनी संजय कदम यांना पाठिंबा दिला आहे. एकप्रकारे अनिकेत कदम यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे काम करणार आहे. अनिकेत यांच्या या भूमिकेमुळे माजी मंत्री शिवसेनेचे नेते रामदास कदम चांगलेच आक्रमक झाले आहेत. एकप्रकारे काका-पुतण्याचा संघर्ष दापोली मतदारसंघात पाहायला मिळेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.