NCP Parth Pawar 
महाराष्ट्र

Parth Pawar: पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर आमदार नाराज? सुनेत्रा पवारांकडं तक्रारी; राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Parth Pawar: राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीत औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील जागा राष्ट्रवादीनं गमावल्यानंतर राष्ट्रवादीतल्या कुरबुरी अधिक तीव्रतेनं समोर यायला लागल्या आहेत.

Amit Ujagare

NCP Internal Politics: राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीत औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील जागा राष्ट्रवादीनं गमावल्यानंतर राष्ट्रवादीतल्या कुरबुरी अधिक तीव्रतेनं समोर यायला लागल्या आहेत. यामध्ये आता पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली असून याला कारणीभूत ठरले आहेत. खासदार पार्थ पवार. पार्थ पवारांविरोधात राष्ट्रवादीच्या काही वरिष्ठ नेत्यांनी आमदारांनी पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडं तक्रारी केल्या असल्याचं सुत्रांच्या हवाल्यानं साम टीव्हीनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनिकरणाचाही मुद्दा यावेळी कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चेत आल्याचं सांगितलं जात आहे.

पार्थ पवारांविरोधात नाराजी का?

राष्ट्रवादी काँग्रेसनं नुकत्याच काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. यामध्ये मुंबई अध्यक्षपदी झिशान सिद्दकी आणि राष्ट्रीय प्रवक्तेपदी उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. पण या नियुक्त्या करताना कोअर कमिटीतील वरिष्ठ सदस्यांना विचारात घेतलं गेलं नाही, असा थेट आरोप करण्यात आला आहे. कारण या दोन्ही नियुक्त्या पार्थ पवारांकडून परस्पर करण्यात आल्याचा दावा या नेत्यांनी यावेळी केला. पार्थ पवार यांनी अनेक पदांवर आपल्या विचारांची आणि गटाची लोकं बसवल्याचा आरोपही पक्षांतर्गत नेत्यांकडून करण्यात येत आहे. याच कारणामुळं पार्थ पवारांविरोधातील नाराजी वाढत असल्याचा सूर आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीत उमटत होता, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

प्रफुल पटेलांनी टोचले कान

दरम्यान, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी पराभव केला. त्यामुळं आपल्याकडची ही तीन टर्मची जागा गमवावी लागल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी ट्विट करत पक्ष नेतृत्वालाच सल्ला दिला होता. "आजचे विधान परिषदेचे निकाल हा एक स्पष्ट आणि महत्त्वाचा इशारा आहेत. लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी, पक्षाचे प्राधान्यक्रम नव्याने ठरवण्यासाठी आणि संघटनेत सुधारणा करण्यासाठी तातडीने आणि कठोर आत्मपरीक्षण करावे लागेल" अशा शब्दांत प्रफुल पटेल व्यक्त झाले होते.

पक्ष प्रमुखांना डावलून अमित शहांची भेट

त्याचबरोबर कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते मंडळी थेट दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार, पार्थ पवार त्यांना डावलून त्यांनी ही भेट घेतल्याची जोरदार चर्चा झाली होती. त्यामुळं राष्ट्रवादीत नाराजीची चर्चा सुरु झाली होती. यावेळी राज्यात अर्थमंत्रीपदं पुन्हा पक्षाकडं देण्याबाबत आणि राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा झाल्याचं बोललं गेलं, विशेष म्हणजे आम्हाला विचारल्याशिवाय विलिनीकरणाच्या घडामोडी होऊ नयेत, असं यावेळी शहांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना सांगितल्याचंही सुत्रांकडून कळतंय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT