Raj Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Raj Thackeray News : मनसेचा विधानसभेसाठी पहिला धमाका विदर्भातच; राज ठाकरे लवकरच 'ही' घोषणा करणार

Political News : महाविकास आघाडी व महायुतीमधील जागावाटप सुरु आहे. त्यातच आता मनसेनी रणनीती आखली असून राज ठाकरे पहिली यादी लवकरच जाहीर करणार आहेत.

Sachin Waghmare

Mumbai News : तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकांची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. येत्या काळात लवकरच निवडणुकीची घोषणा होणार असल्याचे गृहीत धरून प्रत्येक पक्ष आता जोरदार मोर्चेबांधणी करीत आहे. एकीकडे विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी व महायुतीमधील जागावाटप सुरु आहे. त्यातच आता मनसेनी रणनीती आखली असून राज ठाकरे पहिली यादी लवकरच जाहीर करणार आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी काही दिवसांचाच कालावधी राहिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी व महयुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'मिशन विदर्भ'साठी रणनीती आखली आहे. 27 आणि 28 सप्टेंबर रोजी दोन दिवस मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) अमरावती दौऱ्यावर आहेत. यावेळी ते विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. (Raj Thackeray News)

राज ठाकरे विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. 27 तारखेला पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्हाचा आढावा त्यांच्याकडून घेण्यात येणार आहे. तर 28 तारखेला नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, आणि चंद्रपूर जिल्हाचा आढावा घेणार असल्याचे समजते.

राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापूर्वी 7 उमेदवार जाहीर केले आहेत. आता मनसे विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भातून पहिली यादी राज ठाकरे जाहीर करण्याची शक्यता आहे. 27 तारखेला सकाळी 7.30 वाजता राज ठाकरे यांच अमरावतीत रेल्वे स्टेशनवर आगमन होताच मनसे कार्यकर्ते त्यांचे जोरदार स्वागत करणार आहेत. यावेळीच राज ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भातील नेत्यांची यादी जाहीर करतील, असे बोलले जात आहे.

राज ठाकरेंनी आता पर्यंत मनसेचे 7 उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामध्ये शिवडी-बाळा नांदगावकर, पंढरपूर - दिलीप धोत्रे, लातूर ग्रामीण - संतोष नागरगोजे, हिंगोली - बंडू कुटे, चंद्रपूर - मनदीप रोडे, राजुरा - सचिन भोयर, वणी - राजू उंबरकर यांचा समावेश आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वेगळी भूमिका

त्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत वेगळी भूमिका घेतली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग, मुंबई आणि पुणे अशा 4 सभा घेतल्या होत्या. या सभांमधून त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले होते.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि त्यांच्या विचारांच्या महाराष्ट्रात 31 जागा निवडून आल्या होत्या. त्यानंतर राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी राज ठाकरेंनी मराठवाडा, सोलापूर आणि विदर्भाचा दौराही केला होता. त्यामुळे येत्या काळात राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT