Mumbai News : महाराष्ट्र नव निर्माण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (ता.७) आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी विविध विषयांवर चर्चा करताना एकनाथ शिंदे यांच्या नकार घंटेवर नाराजी व्यक्त केली. तर त्यांच्यामुळेच मनसेला महायुतीत सहभागी होता आलं नाही, असा सूर आळवला. यामुळे राज ठाकरे यांनी जे झाले, ते विसरा आणि निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश दिले आहेत. पण आता या नव्या खुलाशामुळे शिंदे यांची शिवसेना आणि मनसे नेते आता आमने-सामने आले आहेत.
लोकसभेपाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीत मनसे सहभागी होणार अशी जोरदार चर्चा झाल्या. मात्र अद्यापही मनसेला महायुतीत एन्ट्री झालेली नाही. मनसेची महायुतीतील सहभाग फक्त एकनाथ शिंदे यांच्यामुळेच होऊ शकला नाही, असा आरोप आता करण्यात आला आहे. मनसेनं जेव्हा लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तेव्हा धनुष्यबाण चिन्हाची ऑफर देण्यात आली. यामुळे ती ऑफर राज ठाकरे यांनी धुडकवली होती. तसेच मनसे आणि भाजप यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असताना शिवसेनेमुळे युती होऊ शकली नाही, असा देखील दावा करण्यात आला.
मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची झालेल्या दीड तास बैठकीत आगामी महापालिका निवडणुकांच्या मुद्द्यावर चर्चा झाली. यावेळी महायुतीसोबत जायचं की एकला चलोची भूमीका घ्यायची याबाबत चर्चा झाली. तर याबाबत एक एक कमिटी तयार करण्यावर एक मत झाले असून या कमिटीशी युती करायच्या वेळी चर्चा केली जाईल, असा निर्णय घेण्यात आला. पण आता याच मुद्द्यावरून राज्याचे राजकीय वातावरण गरम झाले असून शिंदे यांच्या शिवसेनेच्या एका नेत्याने थेट हल्लाबोल केला आहे.
शिवसेना नेते आमदार योगेश कदम यांनी मनसे नेत्यांच्या आरोपावरून थेट इशारा देताना, शिंदे यांना दोष देणार असाल तर आम्ही ऐकून घेणार नाही, असे म्हटले आहे. तर विधानसभेत उलट मनसेमुळेच आमचे दहा आमदार पडल्याचा दावा देखील कदम यांनी केला आहे.
तसेच कदम यांनी राज ठाकरे यांच्या लोकसभेवेळच्या वक्तव्याचा उल्लेख करताना, राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. तर तो पाठिंबा फक्त लोकसभेसाठीच असेल असेही जाहीर केले होते. तर पुढचा निर्णय नंतर घेऊ असाही निर्णय घेतला होता.
त्यांनी विधानसभेचा निर्णय त्याचवेळी घ्यायला हवा होता. पण त्यांच्याच मनात संभ्रम होता किंवा त्यांना विधानसभेबाबत निर्णयच घ्यायचा नव्हता. पण आता अशापद्धतीने आरोप करणे योग्य नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जो पक्ष किंवा महायुती योग्य वाटत असेल तर सोबत यावं असेही कदम यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मनसेची भूमिका काय असणार? कोणाशी युती करणार? स्वबळावर मनसे निवडणुका लढवणार का? याबाबते सर्व निर्णय राज ठाकरे घेतील. याबाबत पक्षातील नेत्यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याचेही संदीप देशपांडे यांनी यावेली सांगितले.