
Indian politics discussion : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची बुधवारी 100 वी जयंती आहे. त्यानिमित्ताने सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यासह सर्वस्तरातील मान्यवरांनी त्यांना विनम्र अभिवादन केले. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेले ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे. त्यामध्ये त्यांनी सत्तेत आल्यावर कधी सुडाचे राजकारण केले नाही, की दीर्घकाळ विरोधी पक्षांत बसलो म्हणून जबर राजकीय महत्वकांक्षा जागृत होऊन त्यांनी सत्तेत आल्यावर राजकीय शालीनता सोडली नाही. म्हणूनच काँग्रेसकट इतर सर्व पक्षातील लोकांच्या मनात अटलजींबद्दल कमालीचा आदर होता आणि आजदेखील आहे, असे ट्विट करीत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'आज अटलजींची 100 वी जयंती. भारतीय जनता पक्षाच्या ज्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल आदर, कुतूहल होतं आणि ज्या नेत्यांनी देखील माझ्याबद्दलच्या स्नेहात कधीही हात आखडता घेतला नाही, त्यात अटलजी हे अग्रणी होते. स्व. बाळासाहेबांवरच्या फोटोबायोग्राफ़ीच्या अनावरण सोहळ्याला अटलजींनी यावं यासाठी मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी देखील तात्काळ मान्यता देत, ते या सोहळ्याला आले.
भारतीय राजकारणात काँग्रेसला (Congress) पर्याय नाहीच असे वाटत असताना, अनेक घटकपक्षांची मोट बांधून, त्यांचे सर्व रागरंग सांभाळून अटलजींनी सरकार चालवलं आणि ते देखील मागच्या शतकाच्या अखेरीस, जेंव्हा भारतात राजकीय, आर्थिक, सामाजिक घुसळण सुरु होती. अशा कठीण परिस्थितीत सरकार चालवत त्यांनी भारतीयांना एक खात्री दिली की काँग्रेसच्या पलीकडे देखील एक राजकीय व्यवस्था या देशाचा कारभार चालवू शकते. आज भारतीय जनता पक्ष जो सत्तेत दिसतोय त्याचा भक्कम पाया अटलजींनी घातला.
साहित्य, संस्कृती, प्राचीन इतिहास अशा विविध विषयांच्या वाचनाने स्फुरलेली अटलजींची वाणी ही जशी मला आकर्षित करते तसंच त्यांच्यातील दुर्दम्य आशावाद देखील मला कायम आकर्षित करत आला आहे. जनसंघ ते भारतीय जनता पक्ष असा प्रवास करत असताना, आणि एकदा तर भारतीय जनता पक्ष 2 खासदारांवर येऊन थांबलेला असताना आणि जनता पक्षाच्या सरकारमधला सहभाग सोडला तर जवळपास 45 वर्ष विरोधी बाकांवर बसून देखील त्यांच्यातील राजकीय आशावाद तसूभर पण कमी झाला नाही.
तत्कालीन सत्ताधाऱ्यांकडून झालेली अहवेलना, आणीबाणीच्या काळात सहन केलेले अत्याचार, हे अटलजींनी सोशिकपणे सोसले, पण सत्तेत आल्यावर त्यांनी कधी सुडाचं राजकारण केले नाही, की दीर्घकाळ विरोधी पक्षांत बसलो म्हणून जबर राजकीय महत्वकांक्षा जागृत होऊन त्यांनी सत्तेत आल्यावर राजकीय शालीनता सोडली नाही. म्हणूनच काँग्रेसकट इतर सर्व पक्षातील लोकांच्या मनात अटलजींबद्दल कमालीचा आदर होता आणि आजदेखील आहे.
सत्तेत नसताना आणि सत्तेत असताना त्यांच्यातील कलासक्त मन त्यांनी कोमेजू दिलं नाही. राजकरण्याच्या मनात फक्त राजकारणाचा विचार असून उपयोग नाही, तर त्यात कलासक्तता देखील हवी. जी अटलजींच्यात होती. अटलजींचे असे अनेक पैलू मला कायम आकर्षित करत आले आहेत. अटलजींच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन.'
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.